खामगावला कन्या जन्माचे अनोखे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको, हा मोलाचा संदेश देण्यासाठी खामगाव सामान्य रुग्णालयाच्या परिचारिकांनी पुढाकार घेत बुधवार (ता.15) मकर संक्रांतीचे औचित्‍य साधून  मातेला साडी-चोळी आणि बाळाला झबला देत कन्‍या जन्‍माचे स्‍वागत केले. यावेळी सकस आहाराचे वाणही महिलांना देण्यात आले. 

खामगाव (जि.बुलडाणा) : मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको, हा मोलाचा संदेश देण्यासाठी खामगाव सामान्य रुग्णालयाच्या परिचारिकांनी पुढाकार घेत बुधवार (ता.15) मकर संक्रांतीचे औचित्‍य साधून  मातेला साडी-चोळी आणि बाळाला झबला देत कन्‍या जन्‍माचे स्‍वागत केले. यावेळी सकस आहाराचे वाणही महिलांना देण्यात आले. 

खामगाव सामान्‍य रुग्‍णालयात या अभिनव उपक्रमाचे उद्‌घाटन नगराध्यक्षा अनिता डवरे यांच्‍या हस्‍ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर वानखडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. निलेश टापरे, डॉ. सुलेखा मेंढे यांच्‍यासह मान्‍यवरांची उपस्‍थिती होती. स्‍त्री जन्‍मदरात बुलडाणा जिल्‍हा रेडझोनमध्ये असल्‍याने बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाअंतर्गत आजपासून दर बुधवारी सामान्‍य रुग्‍णालयात कन्‍या जन्‍माचे स्‍वागत या पध्दतीने केले जाईल, अशी माहिती डॉ. टापरे यांनी याप्रसंगी दिली. 
सामान्‍य रुग्‍णालयाचा हा उपक्रम प्रशंसनिय असून सामाजिक संस्‍थांनी या उपक्रमात सहभाग घ्यावे, असे आवाहन करत या उपक्रमासाठी आपण सहकार्यक करणार असल्‍याचे नगराध्यक्ष अनिता डवरे यांनी सागितले. त्‍यानंतर सर्व मातांना साडी, चोळी झबला व सकस आहाराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी सामान्‍य रुग्‍णालयातील परिचारीका सुमित्रा राऊत गवळी, कमल पद्मने, सरला झोडपे, माया वानखडे, रेखा खडबडे, बाली वासनकर, मिरा घाटे, माधुरी मोरे, अर्चना नारे, श्रध्दा मोहनकर यांनी पुढाकार घेतला. 

प्रसुती रुग्‍ण कक्षात थोर महिलांच्‍या प्रतिमा
समाजाच्‍या जडणघडणीत मोलाचे योगदान असलेल्‍या थोर क्रांतीकारी महिलांच्‍या प्रतिमा सामान्‍य रुग्‍णालयातील प्रसुती कक्षात लावण्यात आल्‍या आहेत. त्‍यामध्ये राजमाता जिजाऊ, क्रांती ज्‍योती सावित्रीबाई फुले, आद्यमहिला पत्रकार तानुबाई बिर्जे, झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्‍यासह विविध कार्यक्षेत्रात नावलौकिक केलेल्‍या महिलांच्‍या प्रतिमा प्रेरणादायी ठरतील आणि मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा संदेश जाईल असा या मागचा हेतू आहे.

समाजसेवी संघटनांचे उपक्रमात स्वागत
स्‍त्रीभ्रुण हत्‍येला आळा बसावा तसेच मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हा उपक्रम आणखी प्रभावीपणे समाजात पोहचला पाहिजे. या करीता मकर संक्रांतीपासून कन्‍या जन्‍माचे स्‍वागत करण्याचा उपक्रम परिचारीकांच्‍या पुढाकारातून राबविल्‍ाा जात आहे. आज या उपक्रमाला सुरुवात झाली. समाजसेवी संघटनांना या उपक्रमात सहभागी व्‍हायचे असल्‍यास त्‍यांचे सुध्दा स्‍वागत आहे.
-डॉ. निलेश टापरे, निवासी वैद्यकीय अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khamgaon girl child birth celebration