लोखंडी रॉड डोक्‍यावर मारून केला खुशीचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

केळवद/हिंगणा : मित्रांसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून वाद झाल्याने डोक्‍यावर लोखंडी जॅक मारून खुशी परिहारचा खून केल्याची कबुली आरोपी अश्रफ अफसर शेख (वय 21, रा. जाफरनगर, नागपूर) याने दिली आहे. दुसरीकडे खुशी परिहारच्या खुनानंतर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कुटुंबीयांसह शोकसंतप्त जमावाने हिंगणा मार्गावर बालाजीनगर चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूला टायर पेटवून रास्ता रोको केला.

केळवद/हिंगणा : मित्रांसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून वाद झाल्याने डोक्‍यावर लोखंडी जॅक मारून खुशी परिहारचा खून केल्याची कबुली आरोपी अश्रफ अफसर शेख (वय 21, रा. जाफरनगर, नागपूर) याने दिली आहे. दुसरीकडे खुशी परिहारच्या खुनानंतर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कुटुंबीयांसह शोकसंतप्त जमावाने हिंगणा मार्गावर बालाजीनगर चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूला टायर पेटवून रास्ता रोको केला.
केळवद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (मोहतकर) येथे खुशी जगदीश परिहार (वय 19, रा गिट्टीखदान) या तरुणीचा गळा चिरून व चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. 13) सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व केळवद पोलिसांनी संयुक्तरीत्या चौकशी करून आरोपी अश्रफ अफसर शेख यास अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली आहे. या प्रकरणी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुशी व अश्रफ दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गिट्टीखदान परिसरात राहत होते.
संपूर्ण जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या खुशी परिहार हत्याकांडातील मुख्य आरोपी अश्रफ अफसर शेख याची केळवद पोलिसांनी सावनेर फौजदारी न्यायालयात दहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने त्यास 19 जुलैपर्यंत सहा दिवसांचा पीसीआर दिला. केळवद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. खुशीचा खून करण्यापूर्वी तो खुशीसोबत लॉंग ड्राइव्हवर गेला होता. नागपूरहून फेटरीमार्गे कळमेश्‍वर व तेथून पाटणसांवगीमार्गे सावनेरच्या पुढे बैतुल महामार्गावरील सावळी (मोहतकर) येथे आला. दरम्यान, कारमध्ये अश्रफने खुशीसोबत त्याच्या मित्रांशी वाढलेल्या संबंधाचा विषय काढला. यावरून दोघांत कडाक्‍याचे भांडण झाले. दारूच्या नशेत असणाऱ्या अश्रफने गाडीतील लोखंडी जॅकच्या रॉडने खुशीच्या डोक्‍यावर जोरदार प्रहार केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याने तिच्यावर वार करणे सुरूच ठेवले. यामुळे तिचा चेहरा विद्रूप झाला. चेहरा विद्रूप झाल्याने तिला कुणी ओळखू शकणार नाही, अशा भ्रमात मृतदेह रस्त्याच्या शेजारी फेकून देत रात्री दोनच्या सुमारास परत नागपूरला आला, अशी कबुली पोलिसांकडे दिली आहे. पुढील तपास केळवदचे ठाणेदार सुरेश मट्टामी, पोलिस उपनिरीक्षक अनिल देरकर, राजू रेवतकर, रवींद्र चटप करीत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khushi killing by iron rod