अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नागपूर - आमदार निवासातील बलात्काराचे प्रकरण गाजत असतानाच सोमवारी आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित मुलीवर आरोपीने सलग तीन दिवस अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. एकापाठोपाठ होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

नागपूर - आमदार निवासातील बलात्काराचे प्रकरण गाजत असतानाच सोमवारी आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित मुलीवर आरोपीने सलग तीन दिवस अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. एकापाठोपाठ होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

पीडित 16 वर्षीय मुलगी अमिता (बदललेले नाव) हिंगणा येथे राहते. तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. एमआयडीसीतील महाजनवाडी येथे राहणाऱ्या तिच्या वर्गमैत्रिणीच्या भावाचा विवाह होता. स्वागत समारंभासाठी ती बुधवारी रात्री आठ वाजता घरून निघाली. तेथे तिचा मित्र आणि नातेवाईक असलेला अभिजित (रा. जरीपटका) आला होता. रात्री अकरा वाजता अभिजितने घरी सोडून देतो, असे सांगितल्याने ती त्याच्या दुचाकीवरून निघाली. मात्र, त्याने तिला जरीपटक्‍यातील आपल्या खोलीवर नेले. खूप रात्र झाल्याने आईवडील रागावतील. त्यामुळे रात्रभर माझ्याच खोलीत राहा, असे तिला सांगितले. ती त्याच्या भूलथापांना बळी पडली. 

दुसऱ्या दिवशी तिने घरी सोडून देण्यास सांगितले. यावेळी त्याने फिरायला जाण्याचा बहाणा केला. तिला फिरायला घेऊन गेला आणि सायंकाळी पुन्हा खोलीवर आणून अत्याचार केला. शनिवारी दुपारी तीन वाजता अमिताला घरासमोर सोडून अभिजितने पळ काढला. 

असा झाला उलगडा 
विवाहाला गेलेली अमिता दोन दिवस झाले तरी घरी न परतल्याने आईने शोधाशोध सुरू केली. शनिवारी अमिता घरी आल्यावर तिने आपबीती सांगितली. अमिताने आईसह एमआयडीसी ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी लगेच अभिजितला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

तीन महिन्यांत 25 घटना 
आमदार निवासात एका 17 वर्षांच्या मुलीवर मनोज भगत आणि रजत गद्रे या दोघांनी सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंबाझरीत एका विधवेवर शेजारी राहणाऱ्या युवकाने अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले. रविवारी सीताबर्डी भागातून 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून सहा जणांनी अत्याचार केल्याची घटना पुढे आली. गेल्या तीन महिन्यांत 25 पेक्षा जास्त अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे उपराजधानीत खरेच महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

Web Title: kidnapping a minor girl