किडनी प्रत्यारोपणाची सोय फक्त नागपुरात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

अस्मान हा चाळिशीतील युवक. दिवसभर सायकलवरून डबे पोहोचवण्याचे काम करतो. गांधीबाग असो की बर्डी, येथील दुकानांमध्ये डबे पोहोचविणे हाच त्याचा व्यवसाय. यातून मिळालेल्या पैशातून त्याची गुजराण होते. अचानक एक दिवस त्याला हृदयविकाराचा झटका आला. रस्त्यावर पडला. लोकांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत त्याच्यावर उपचार झाले. घरातील कर्त्या पुरुषाचा जीव वाचला. कुटुंबाचा आधार शाबूत राहिला. अस्मानचे डबे पोहोचवण्याचे काम सुरळीत सुरू आहे. रस्त्यावरचे आयुष्य जगणाऱ्या अस्मानच्या मदतीला धावून आली सरकारची राजीव गांधी जीवनदायी योजना. तब्बल दीड लाख रुपयांचा खर्च या योजनेतून अस्मानवर करण्यात आला. 

दारिद्र्यरेषेखाली असलेल्यालाच नव्हे, तर मध्यमवर्गीयांच्या आरोग्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना वरदान ठरत आहे. या योजनेतून उपचाराची हमी त्यांना शासनातर्फे देण्यात आली आहे. हीच कथा सुधाकर खराट यांचीही आहे. दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने नियमित डायलिसिसवर आयुष्य होते. बहिणीने किडनी दान देण्याचे ठरविले. परंतु, पैसा नव्हता. प्रत्यारोपणासाठी अडीच लाखांचा खर्च येणार होता. अखेर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण झाले. एक नव्हे, तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १० किडनींचे प्रत्यारोपण झाले. राज्यात सरकारी रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपणाची सोय केवळ नागपूरच्या सुपर स्पेशालिटीत आहे. किडनीप्रमाणेच गेल्या दशकात ३५ हजार गरिबांच्या हृदयासाठी सुपर वरदान ठरले आहे. २०१३ मध्ये राज्य सरकारने राजीव गांधी आरोग्यदायी योजना सुरू केली. या तीन वर्षांत नागपूर जिल्ह्यांमध्ये हृदय, किडनी, मेंदू, कॅन्सरसह ३० प्रकारच्या स्पेशालिटीमध्ये सुमारे ५५ हजार रुग्णांना आर्थिक मदत करून त्यांचे आरोग्य जपण्याचे काम शासनाने केले आहे. लवकरच या योजनेचे नामांतर होणार आहे. येत्या मार्च २०१६ पासून राजीव गांधी जीवनदायी योजनेचे महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य अभियान असे नामकरण केले जाणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी १,९९६ कोटी रुपयांची तरतूद
 राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसाटी ३०० कोटी रुपयांची तरतूद
अर्भक मृत्यू प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने त्वरित उपचारासाठी ७० नवजात शिशू रुग्णवाहिका देणार
राज्यात विविध आरोग्य संस्थांच्या बांधकामासाठी ३९० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य

Web Title: Kidney transplant facilities only in Nagpur