एकाच दिवशी यकृतासह किडनीचे प्रत्यारोपण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

एकाच दिवशी यकृतासह किडनीचे प्रत्यारोपण
नागपूर : मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी अवयवदानाला होकार दिल्याने सोमवारी (ता. 27) शहरात एकाच दिवशी यकृतासह दोन्ही किडनींचे प्रत्यारोपण करीत तिघांचे जीव वाचवण्यात आले. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृतासह किडनी प्रत्यारोपण झाले. वयाची साठी ओलांडल्याने हृदयाचे प्रत्यारोपण मात्र होऊ शकले नाही.

एकाच दिवशी यकृतासह किडनीचे प्रत्यारोपण
नागपूर : मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी अवयवदानाला होकार दिल्याने सोमवारी (ता. 27) शहरात एकाच दिवशी यकृतासह दोन्ही किडनींचे प्रत्यारोपण करीत तिघांचे जीव वाचवण्यात आले. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृतासह किडनी प्रत्यारोपण झाले. वयाची साठी ओलांडल्याने हृदयाचे प्रत्यारोपण मात्र होऊ शकले नाही.
अवयवदान करणाऱ्या 64 वर्षीय मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव विजय बडवाईक (सोनेगाव) असे आहे. अपघातात गंभीर जखमी झाल्याने बडवाईक यांना 23 ऑगस्टला न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. रविवारी मेंदूचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी निदान केले. यकृताच्या प्रतीक्षेत उषा राणी ही महिला न्यू इरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. समितीच्या समन्वयक वीणा वाठोरे यांनी तसा निरोप दिला. अवयव रिट्रायव्हलसाठी डॉ. संदीप देशमुख, डॉ. संजय कोलते यांनी सहकार्य केले. तर डॉ. रवी देशमुख, डॉ. रोहित गुप्ता आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. एस. जे. आचार्य यांनी न्यू इरात पहिले किडनी प्रत्यारोपण केले. याशिवाय डॉ. राहुल सक्‍सेना, डॉ. संजय गोझा, डॉ. राहुल राय यांनी यकृत प्रत्यारोपण केले, असे डॉ. आनंद संचेती यांनी सांगितले.
12 वे यकृत प्रत्यारोपण
उपराजधानीतील हे 12 वे यकृत प्रत्यारोपण आहे. यापैकी न्यू इरा हॉस्पिटलमध्ये 10 प्रत्यारोपण झाले आहेत. बडवाईक यांच्या अवयवदानातून यकृत उषा राणी यांच्या शरीरात प्रत्यारोपित केले. तर एक किडनी न्यू इरा हॉस्पिटलमधील नागेश अग्रवाल यांच्या तर दुसरी किडनी वोक्‍हार्ट हॉस्पिटलमधील आसिफ कुरेशी यांच्या शरीरात प्रत्यारोपित केली.
पाच वर्षांमध्ये 2013 पासून आतापर्यंत मेंदूपेशी मृत झालेल्या 38 रुग्णांच्या यकृताचे दान झाले आहे. त्यापैकी 12 यकृतांचे प्रत्यारोपण नागपुरात झाले. उर्वरित यकृत दिल्ली, चेन्नई आणि मुंबईत प्रत्यारोपित करून जीव वाचवण्यात आले. याशिवाय 68 किडनीचे दान नागपुरात झाले.
-डॉ. विभावरी दाणी, अध्यक्ष, विभागीय अयवय प्रत्यारोपण समन्वय समिती, नागपूर.

Web Title: Kidney transplant with liver on the same day

टॅग्स