उपराजधानीत एकाचवेळी यकृत आणि किडनी प्रत्यारोपण

File photo
File photo

नागपूर : जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात. पण, काही माणसे आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांसाठी जगतात. उपराजधानीत हा अनुभव रविवारी झालेल्या अवयवदानातून आला. तेवीस वर्षांच्या सूरज दुधपचारे या युवकाने जगाचा निरोप घेताना इतरांच्या जीवनात प्रकाश पेरला. सूरज आपल्या मेंदूमृत्यूनंतर इतरांच्या कामी आला, दोन जणांना जीवनदान दिले.
विशेष असे की, मृत्यूच्या घटका मोजत असलेल्या 63 वर्षीय अरुण यांच्यावर रविवारी (ता.18) न्यू इरा हॉस्पिटलमध्ये एकाचवेळी यकृत आणि किडनीच्या यशस्वी प्रत्यारोपणातून जीवनदान मिळाले.
कामठी येथील रहिवासी सूरज याचा गुरुवारी कोराडी-महादुला मार्गावर अपघात झाला. नातेवाइकांनी त्याला लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, 17 नोव्हेंबरला सूरजच्या मेंदूपेशी मृत्यू पावल्याचे निदानातून पुढे आले. अश्विनी चौधरी, अविनाश शर्मा, शुभम राऊत, मुरली चौधरी यांच्या पुढाकारातून मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश अग्रवाल, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आनंद संचेती, डॉ. निधीश मिश्रा यांनी सूरजचे वडील मनोहर, भाऊ कैलास, सरपंच सुनील दुधपचारे यांचे समुपदेशन करीत अवयवदान हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल, हा विश्‍वास दिला. नातेवाइकांनी सूरजचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.
नातेवाइकांनी तयारी दाखवल्यानंतर विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीला दिलेल्या सूचनेनुसार प्रतीक्षा यादी तपासली. दुर्ग येथील एक रुग्ण यकृत आणि किडनीच्या प्रतीक्षेत असल्याचे निदर्शनास आले. यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. राहुल सक्‍सेना, डॉ. वरुण महाबळेश्वर, डॉ. अमित देशपांडे, डॉ. राजीव सिन्हा, भूलतज्ज्ञ डॉ. साहिल बंसल, डॉ. अनिल, डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. रवी देशमुख यांच्या पथकाने एकाच वेळी यकृत आणि किडनी प्रत्यारोपण यशस्वी केले.
उपराजधानीत यकृत प्रत्यारोपणाची क्रांती
नागपुरात 13 वे यकृत प्रत्यारोपण रविवारी झाले. त्यापैकी 12 यकृत प्रत्यारोपण न्यू इरा हॉस्पिटलमध्ये झाले आहेत. याशिवाय दोन किडनी प्रत्यारोपणासह उपराजधानीने देशाच्या कानाकोपऱ्यात अवयव दानातून 39 जणांचे यकृत दानातून प्राण वाचवले आहेत. अवयवदानातून जीवनदानाची क्रांती उपराजधानीत झाली आहे.
सूरजचे यकृत आणि दोन्ही किडनी निकामी झाल्याने उपचाराला दाद मिळत नव्हती. त्याला जगवण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्‍टरांनी केले. मात्र, मेंदूपेशी मृत झाल्या होत्या. एकाचवेळी यकृत आणि किडनी प्रत्यारोपणाची दुहेरी शस्त्रक्रिया मध्य भारतात पहिल्यांदाच झाली आहे.
-डॉ. आनंद संचेती, न्यू इरा हॉस्पिटल, लकडगंज.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com