नर्सरीच्या चिमुकलीस शिक्षिकेची अमानुष मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

वरोरा (जि. चंद्रपूर) : गृहपाठ बरोबर करीत नसल्याने शिक्षिकेने चिडून जाऊन नर्सरीतील एका चिमुकलीस अमानुषपणे मारहाण केली. सोशल मीडियातून हा प्रकार समोर आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. त्या शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी पालकांनी केली आहे. याच संस्थेत चार महिन्यांपूर्वी शिक्षिकेच्या उपस्थितीत वर्गात विद्यार्थ्याकडून पेनहुक्का करण्याचा प्रकार घडला होता.

वरोरा (जि. चंद्रपूर) : गृहपाठ बरोबर करीत नसल्याने शिक्षिकेने चिडून जाऊन नर्सरीतील एका चिमुकलीस अमानुषपणे मारहाण केली. सोशल मीडियातून हा प्रकार समोर आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. त्या शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी पालकांनी केली आहे. याच संस्थेत चार महिन्यांपूर्वी शिक्षिकेच्या उपस्थितीत वर्गात विद्यार्थ्याकडून पेनहुक्का करण्याचा प्रकार घडला होता.
15 जुलै रोजी सकाळी सेंट ऍनिस नर्सरीतील मुलांना शिक्षिका वृषाली गोंडे इंग्रजीतील अल्फाबेट पद्धत शिकवीत होत्या. शिकवीत असताना दोन मुले बरोबर करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्याकडून लक्षपूर्वक अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न शिक्षिकेने केला. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. शेवटी शिक्षिकेचा पारा भडकला. बाजूला ठेवून असलेल्या छडीने एका चिमकलीच्या पाठीवर मारण्यास तिने सुरुवात केली. या वेदनेने मुलगी किंचाळत होती. हा प्रकार बघून नर्सरीतील सगळी मुले स्तब्ध राहून निमूटपणे बघत राहिली. घडलेला हा प्रकार मुलीने आपल्या आई-वडिलांना घरी येऊन सांगितला. प्रथमदर्शनी आपल्या मुलीला काहीच न आल्याने शिक्षिकेने मारले असावे, असे पालकांना वाटले. मात्र, जेव्हा तिच्या पाठीवर उमटलेले व्रण पाहून पालकांना धक्का बसला. हा सगळा प्रकार त्यांनी वॉर्डातील एका राजकीय पक्षाच्या आपल्या जवळच्या मित्रांना सांगितला. त्यामुळे राजकीय पक्षाचा पालकाचा मित्र तेथे चौकशीसाठी पोहोचले. तेव्हा शिक्षिकेने झालेल्या प्रकाराची माफी मागितली. आपल्या मुलीला याच शाळेत पुढील शिक्षण घ्यायचे आहे. त्यामुळे शिक्षिकेशी व संस्थेशी पंगा नको, या विचाराने त्यांनी नमते घेतले. मात्र, आमची मुलगी त्या शिक्षिकेच्या हाताखाली शिकणार नाही. तिला वर्ग बदलून हवा, ही अट घालून त्यांनी सशर्त माघार घेतली.
शिक्षिकेला नोटीस
याबाबत मुख्याध्यापिका ब्लेसी यांना विचारणा केली असता त्यांनी संबंधित शिक्षिकेला नोटीस बजावल्याचे सांगितले. यापुढे मुलांना मारहाण होण्याची घटना घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्या मुलीला दुसऱ्या तुकडीमध्ये स्थानांतरण करण्यात येईल. यापुढे वर्गामध्ये छडीचा वापर करण्यात येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kids beat of nursery school teacher