छोट्यांचे मोठे यश

मनीषा मोहोड
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

छोट्यांचे मोठे यश

छोट्यांचे मोठे यश
नागपूर : छोटा बच्चा जान के हमसे ना टकराना रे... असं म्हणणाऱ्या लिटल जीनिअसची संख्या समाजात वाढली आहे. नागपूरमध्येही अशा मास्टर जीनिअसची संख्या लक्षणीय आहे. नुकताच "कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात साडेसहा लाख जिंकलेल्या अकरा वर्षांच्या तुषित निकोसेची जगभरात चर्चा सुरू आहे. नागपुरातील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, फेटरी काटोल येथील इयत्ता सहावीतील तुषित नीरज निकोसे याची 12 लाख मुलांमधून केबीसीमध्ये निवड झाली. तुषितचे वडील ग्रामीण भागात आदिवासी लोकांसाठी काम करणाऱ्या बीएआयएफ या स्वयंसेवी संस्थेत राळेगाव (जि. यवतमाळ) नोकरीला आहेत. नागपूरला आत्याच्या घरी राहणाऱ्या तुषितने रात्रंदिवस अभ्यास करून "कौन बनेगा करोडपती'ची तयारी केल्याने तो पहिल्याच प्रयत्नात केबीसीमध्ये पोहोचला. स्पर्धेतील प्रश्‍नांची अचूक उत्तरे देत त्याने बक्षिसाबरोबर प्रेक्षकांची मनेही जिंकली. होतकरू विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून, शिक्षण आरोग्य, क्रीडा, कला आदी क्षेत्रांत काम करून आदर्श निर्माण करण्याचा तुषितचा मानस आहे.
अभिनवची अलौकिक बुद्धिमत्ता
बहादुरातील संजुबा हायस्कूल सीबीएसई स्कूलमधील इयत्ता सातवीतील विद्यार्थी अभिनव शत्रुघ्न ठाकूर याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये जलद गतीने 100 वेळा टेबल लिहिण्याचा रेकॉर्ड केल्याने त्याची इंडिया बुक ऑफ रेकार्डसमध्ये नोंद करण्यात आली आहे. जून 2018 मध्ये अभिनवने हा रेकॉर्ड केला आहे. त्याने जलदगतीने 100 वेळा तीन अंकी गुणाकाराचा टेबल लिहिण्याचा रेकार्ड अवघ्या 2.88 मिनिटांत केला आहे. अशा प्रकारचा रेकॉर्ड आजवर कुणीही केला नाही. असा जागतिक स्तरावर विक्रम करणारा नागपूरचा अभिनव ठाकूर एकमेव विद्यार्थी ठरला आहे.
दिव्या वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियन
नागपूरची महिला फिडे मास्टर म्हणून ओळख असलेल्या अकरा वर्षांच्या दिव्या देशमुखने बुद्धिबळ स्पर्धेत जगभरात आपली छाप सोडली आहे. 12 वर्षांखालील मुलींच्या वर्ल्ड कॅडेट बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने विजेतेपद पटकावले आहे. उल्लेखनीय म्हणजे दिव्याने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. दिव्याने वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपचे विजेतेपद चौथ्यांदा पटकावण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी 2014, 2015 आणि 2016 मध्ये दिव्याने ही कामगिरी केली आहे. बुद्धिबळातील वंडर गर्ल अशी ओळख असलेली दिव्या डॉ. जितेंद्र व डॉ नम्रता देशमुख यांची कन्या आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळणाऱ्या दिव्याने यापूर्वी कॉमनवेल्थ बुद्धिबळ स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे.

Web Title: Kids news