यवतमाळ - शेलू शेंदूरसनी येथे एका व्यक्तीचा अज्ञाताकडून खून

बबलू जाधव
बुधवार, 4 जुलै 2018

आर्णी (यवतमाळ) : तालुक्यातील शेलू शेंदूरसनी येथील राजेंद्र अंबादास मस्के (वय 45) यांचा त्यांच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना मंगळवारी (ता.3) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत आज बुधवारी (ता.4) सकाळी गुन्हा दखल करण्यात आला.

कारागीर असलेला राजेंद्र कामानिमित्त नेहमी बाहेरगावी राहायचा. दारूच्या व्यवसनामुळे त्याचे पत्नीसोबत पटत नव्हते. म्हणून आठ वर्षांपासून त्याची पत्नी दोन्ही लेकरांसह तिच्या माहेरी वाईमेंढी येथे राहत होती. दरम्यान, मंगळवारी दुपारी तीनच्यापूर्वी त्याच्या राहत्या घरी कोणीतरी व्यक्तीने राजेंद्रच्या छातीवर, गळ्यावर व डोक्याच्या मागील बाजूस धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला, अशा आशयाची फिर्याद राजेंद्रचे वडील अंबादास तुकाराम मस्के (वय 67, रा. शेलू शेंदूरसनी) यांनी आज बुधवारी (ता.4) सकाळी पाचला आर्णी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच श्‍वान पथकासह ठसेतज्ज्ञ घटनास्थळी रात्री उशिरा दाखल झाले. त्यानंतर अपर पोलिस अधीक्षक अमरसिंग जाधव, दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, संदीप चव्हाण यांनीही भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. 

खुनाचे कारण अस्पष्ट
राजेंद्रचा खून कोणी व का केला, याबाबतचा तपास ठाणेदार यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन भोंडे, जमादार गजानन खांदवे, अरुण पवार, संदीप चरडे यांचे पथक करीत आहे.

Web Title: killed one by unknown in yawatmal