फुलपाखरांच्या आकाराचे "किलर ड्रोन रोबोट'

फुलपाखरांच्या आकाराचे "किलर ड्रोन रोबोट'

नागपूर - अभियंत्यांनी ड्रोन विकसित केले आणि अनेक अशक्‍यप्राय बाबी सहज शक्‍य होणार या जाणिवेने मानव हरखून गेला. ड्रोनद्वारे औषधी किंवा महत्त्वाचे पार्सल कमी वेळेत पोहोचविणे तसेच जेथे मानवाला जाता येणे शक्‍य नाही तेथे ड्रोन पाठवून तेथील छायाचित्र मिळविणे, विविध माहिती घेणे आवाक्‍यात आले. परंतु, औषधांऐवजी ड्रोनद्वारे स्फोटके पाठवली तर किती नुकसान होईल याची कल्पनाच केलेली बरी. असे तंत्रज्ञान विकसित झाल्याबद्दल जाणकारांमध्ये दुमत आहे. तरीही यामुळे मानवासमोर मोठे संकट उभे ठाकणार आहे. 

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये फुलपाखरांसारखे तळहातावर मावतील अशा आकाराचे असंख्य ड्रोन विद्यापीठात शिरतात. सर्वांत आधी काही ड्रोन विद्यापीठाच्या इमारतींना लक्ष्य करून तेथील भिंतींना भगदाडे पाडतात. त्यातून अन्य ड्रोन आत शिरतात. ज्याची हत्या करायची आहे त्याचा फोटो प्रत्येक ड्रोनमध्ये फीड केलेला आहे. त्या विशिष्ट "टार्गेट'ला शोधून हे ड्रोन त्याच्या डोक्‍यावर नेम साधून थेट कपाळात गोळी मारतात. क्षणात खेळ खल्लास. काही चित्रपटांमध्येही अशा प्रकारचे दृश्‍य वापरण्यात आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होऊन त्याला लाखो हिट्‌स मिळाले. विकसित देशांमध्ये याची चर्चा सुरू झाली. विचार करा, हा प्रसंग प्रत्यक्ष जीवनात घडला तर? खरेच असे घडले तर अपिरमित हानी होणार याबद्दल दुमत नाही. परंतु, स्फोटकांनी भरलेले हे लहान ड्रोन रोखणार कसे, त्यांचा सामना कसा करणार, हा फार मोठा प्रश्‍न आहे. 

ड्रोनचे वर्णन सोप्या शब्दांत करायचे, तर "यूएव्ही' म्हणजे "अनमॅन्ड एरियल व्हेइकल' अर्थात मानवरहित उडते वाहन असे म्हणता येईल. सर्वांत आधी त्याचा वापर सैनिकी कारवायांसाठी सुरू झाल्याने सुरुवातीस ड्रोनची ओळख लढाईतील प्रभावी उपकरण म्हणूनच झाली. तेव्हापासूनचे हे संशोधन आताचे अत्याधुनिक ड्रोन निर्माण झाल्यानंतरही सुरूच आहे. तंत्रज्ञानाच्या अफाट वेगामुळे विलक्षण नावीन्यपूर्ण यंत्र विकसित होत आहे, किंबहुना त्यांची निर्मिती केली जात आहे. यातील अनेक संशोधन मानवाच्या विनाशालाच कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत. वास्तविक ड्रोनच्या साहाय्याने अनेक असाध्य बाबी साध्य करता येणार आहेत. यामुळे ड्रोनची निर्मिती ही तंत्रज्ञानातील आधुनिक क्रांती म्हटल्या जाते; परंतु दहशतवादी किंवा माथेफिरूंच्या हाती ड्रोनरूपी अस्त्र पडले तर विनाश हा अटळच. कारण एकदा या ड्रोनमध्ये प्रोग्रॅमिंग झाले, संबंधितांचे छायाचित्र फीड केले की हा ड्रोन त्याच्या टारगेटला यमसदनी पाठविल्याशिवाय मागे फिरणार नाही.

असे लहान किलर ड्रोन रोबोट हजारोंच्या संख्येने तयार केले जातील आणि ते आपल्या शत्रूच्या किंवा देशाच्या विरोधात लढाईसाठी पाठविले जातील. विशेष म्हणजे यामध्ये एक व्यक्ती एका ठिकाणी बसून शेकडो किलोमीटरवरूनही त्यांचे संचालन करू शकणार आहे. 

ड्रोनची उपयुक्तता 

  • मोठ्या आकाराच्या शेतातील पिकांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन उपयुक्त ठरते. ड्रोनला कॅमेरा जोडून शेतकरी एका ठिकाणी बसून प्रत्येक रोपाच्या वाढीवर बारीक लक्ष ठेवू शकतो. 
  • वैद्यकीय क्षेत्रात ड्रोनद्वारे औषधे व इतर वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांचे वितरण तातडीने करता येते. तसेच आपत्कालीन स्थितीत जंगली जनावरे, पक्षी यांचा ठावठिकाणा शोधणे, त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे यासाठीही वापर केला जातो. 
  • पतंग उडविण्याच्या स्पर्धा किंवा कार रेसिंगप्रमाणेच ड्रोनदेखील एक नवा छंद होऊ पाहतो आहे. 
  • नागरी कामांसाठी होणारा वापर लष्कराच्या तुलनेत कितीतरी पटींनी वाढत आहे. 
  • वितरण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांपर्यंत टपाल व इतर छोट्या वस्तू पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर सुरू केला आहे. 
  • काही कंपन्या तर थेट वाहन म्हणूनच ड्रोन वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. या ड्रोन वाहनातून शंभर किलोपर्यंत वजनाच्या प्रवाशाला तीस मिनिटांपर्यंत प्रवास करणे शक्‍य होणार आहे. 

वेळ कमी, सजग व्हा 
मानवाला मारण्यासाठी अशाप्रकारे यंत्र, मशीनचा वापर करणे आमचे स्वातंत्र्य व सुरक्षेच्या दृष्टीने विनाशकारी ठरणार आहे. भविष्यात यापेक्षाही भयंकर व कल्पनेपलीकडचे संशोधन, प्रयोग शक्‍य आहेत. याचा विचार करून आताच आपण सजग झाले पाहिजे. कारण त्यादृष्टीने आपल्याकडे वेळ कमी आहे आणि विज्ञान, तंत्रज्ञानाचा वेग खूप जास्त आहे, असे कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे तज्ज्ञ प्राध्यापक रसेल यांचे मत आहे. 

आण्विक ड्रोन 
स्लॉटरबोट (स्लॉटर+रोबोट) असे नाव असलेले हे ड्रोन लष्करी सज्जता, संरक्षणासाठी वापरणे गैर नाही. यामध्ये छायाचित्र घेण्यासाठी कॅमेरे असून स्फोटके नेता येणे शक्‍य आहे. शिवाय काही बुलेट्‌स (बंदुकीच्या गोळ्या) असतील. एकदा प्रोग्रामिंग केले की हे ड्रोन आपल्या शिकारीचा पिच्छा सोडणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चालणारे लहान "किलर ड्रोन रोबोट' दहशतवाद्यांच्या हातात सापडले तर केवढा गहजब होईल? स्वतःच्या लाभासाठी, उपयोगासाठी काही विकृत लोक हे ड्रोन मिळवून महासंहार घडवून आणू शकतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आण्विक ड्रोन हे या सर्वांवर कडी करणारे राहतील. जैविक अण्वस्त्रांमुळे कल्पनेपलीकडचे नुकसान होऊ शकते, अशी भीती हा व्हिडिओ तयार करणाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासाठी उपाययोजनांवर काम होणे गरजेचे असून मुळात पृथ्वीला विनाशाच्या तोंडावर उभे करणाऱ्या या शस्त्रस्पर्धेला लगाम घालावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com