रौनक ठरला चौसष्ट पटावरील राजा... 

रौनक साधवानी
रौनक साधवानी

नागपूर  : नागपूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानीने अवघ्या तेराव्या वर्षी बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा ग्रॅण्डमास्टर किताब पटकावून उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. असा बहुमान मिळविणारा तो नागपूरचा पहिला व विदर्भाचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला आहे. सर्वांत कमी वयात ग्रॅण्डमास्टर किताब मिळविणारा तो जगातील पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे. एसले ऑफ मॅन (इंग्लंड) येथे सुरू असलेल्या फिडे ग्रॅण्ड स्वीस चेस डॉट कॉम बुद्धिबळ स्पर्धेत त्याने तिसरा व शेवटचा "नॉर्म' मिळवून ग्रॅण्डमास्टर किताबावर शिक्‍कामोर्तब केले. 
13 वर्षीय रौनकला ग्रॅण्डमास्टर किताबासाठी केवळ 21 येलो रेटिंग गुणांची आवश्‍यकता होती. रौनकने सातव्या फेरीतच आवश्‍यक गुणांची कमाई करून ग्रॅण्डमास्टर किताबाला गसवणी घातली. जगभरातील नावाजलेल्या ग्रॅण्डमास्टर्सचा समावेश असलेल्या या स्पर्धेत रौनकने एक विजय आणि सहा सामने बरोबरीत सोडवून सातपैकी चार गुणांची कमाई केली. सात फेऱ्यांमधून मिळविलेल्या 23.2 येलो रेटिंग गुणांमुळे रौनकचे ग्रॅण्डमास्टर किताबासाठी आवश्‍यक 2500 येलो रेटिंग गुण पूर्ण झाले. स्पर्धेच्या आणखी चार फेऱ्या शिल्लक असून, त्यात पराभूत झाला तरीदेखील, रौनकच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही. रौनकने पहिल्या फेरीत रशियाचा ग्रॅण्डमास्टर सुगिरोव्ह साननवर धमाकेदार विजय मिळविल्यानंतर त्याने दुसऱ्या फेरीत ग्रॅण्डमास्टर कर्जाकिन सर्जेई, भारतीय ग्रॅण्डमास्टर सूर्यशेखर गांगुली, ग्रॅण्डमास्टर सारिक इव्हान, ग्रॅण्डमास्टर इलिजानोव्ह पावेल, ग्रॅण्डमास्टर पीटर लेको, ग्रॅण्डमास्टर गॅब्रिएल सार्गिसियानला बरोबरीत रोखले. फिडे ग्रॅण्ड स्वीस चेस डॉट कॉम बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणे अतिशय कठीण असते. मात्र, भारतातील सर्वोत्कृष्ट ज्युनियर खेळाडू म्हणून आयोजकांनी त्याला वाइल्ड कार्ड प्रवेश दिला होता. 
यापूर्वी रौनकचे प्रशिक्षक अमरावतीच्या स्वप्नील धोपाडेने चार वर्षांपूर्वी ग्रॅण्डमास्टर किताब मिळविला होता. तो विदर्भाचा पहिला ग्रॅण्डमास्टर ठरला होता. ग्रॅण्डमास्टर किताब मिळविणारा रौनक विदर्भाचा दुसरा, तर देशातील एकूण 65 वा बुद्धिबळपटू होय. सेंटर पॉइंट काटोल रोडचा विद्यार्थी असलेल्या रौनकने पहिला ग्रॅण्डमास्टर "नॉर्म' याच वर्षी मॉस्को येथे झालेल्या एरोफ्लोत ओपनमध्ये व दुसरा "नॉर्म' फ्रान्समधील पोर्टिसिओ ओपन बुद्धिबळ स्पर्धेत मिळविला होता. रौनकधील टॅलेंट लक्षात घेता पाचवेळचा जगज्जेता विश्‍वनाथन आनंदने त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचे भाकीत वर्तविले होते. रौनकने 13 व्या वर्षी ग्रॅण्डमास्टर किताब मिळवून आनंदचा विश्‍वास सार्थ ठरविला. 
"ग्रॅण्डमास्टर किताब माझे अंतिम स्वप्न होते. ते पूर्ण केल्याचा मला मनापासून खूप आनंद झाला. स्पर्धा अजून संपलेली नाही. आता उरलेल्या चार फेऱ्यांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून, त्यात चांगली कामगिरी करायची आहे. त्यानंतरच ग्रॅण्डमास्टरचा आनंद "सेलिब्रेट' करेल. माझ्या यशात आईवडील आणि गुरूचाही तितकाच वाटा आहे.' 
-रौनक साधवानी, ग्रॅण्डमास्टर 

"रौनक ग्रॅण्डमास्टर बनल्याचा आनंद व अभिमान आहे. रौनकमधील प्रतिभा, मेहनत व सातत्यपूर्ण कामगिरी लक्षात घेता एकदिवस तो आपले स्वप्न पूर्ण करेल, अशी मला अपेक्षा होती. तो दिवस आज उजाडला. हे त्याच्या कठोर मेहनतीचे फळ आहे. भविष्यात तो आणखी यशाचे उच्च शिखर गाठेल, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.' 
-स्वप्नील धोपाडे, विदर्भाचा पहिला ग्रॅण्डमास्टर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com