राजा उदार झाला, हाती भोपळा दिला

download
download

खामगाव : एकीकडे सत्ता स्थापनेसाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेत मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीमध्ये वेळ लागण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. परंतु, आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.

या मदतीमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजार रुपये तर फळबागाकरिता हेक्टरी 18 हजार रुपये तेही फक्त दोन हेक्टरपर्यंत मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत तुटपुंजी आहे की, उत्‍पादन खर्चाची गोळा बेरीच व झालेल्‍या नुकसानीच्‍या अहवालानुसार योग्‍य प्रमाणात जाहीर करण्यात आली आहे. याबाबत सकाळ संवाद दरम्‍यान शेतकरी नेते, पदाधिकारी व शेतकऱ्यांनी आपल्‍या प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली होती.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
परतीच्‍या पावसाने शेतकऱ्यांचे हेक्‍टरी 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे. त्‍यामुळे या पीकहानीपोटी शेतकऱ्यांना हेक्‍टरी किमान 25 हजार रुपयांची मदत राज्‍यपालांनी द्यायला हवी होती. परंतु केवळ हेक्‍टरी 8 हजार म्‍हणजे एकरी तीन ते साडेतीन हजार रुपयांची मदत देऊन राज्‍यपालांनी नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांच्‍या तोंडाला पाने पुसली आहेत. तसेच ही मदत दोन हेक्‍टरपर्यंतच मिळणार असून, जास्‍त क्षेत्र असलेल्‍या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. छोटा-मोठा शेतकरी असे राज्‍यपालांनी वर्गीकरण केले आहे.
-तेजेंद्रसिंह चौहान, जिल्‍हाध्यक्ष काँग्रेस सेवादल, बुलडाणा

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ
यावर्षी खरीप हंगामाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. परतीच्‍या पावसाने शेतकऱ्यांच्‍या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशा परिस्‍थितीत शेतकऱ्यांना मदत करून आधार देण्याची गरज आहे. परंतु सरकार स्‍थापनेचा तिढा सुटत नसल्‍याने राज्‍यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून, सर्व अधिकार हे राज्‍यपालांच्‍या हाती आहे. त्‍यानुसार त्‍यांनी हेक्‍टरी 8 हजारांची मदत जाहीर केली. मात्र, ही मदत म्‍हणजे शेतकऱ्यांच्‍या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. जाहीर केलेल्‍या मदतीतून शेतकऱ्यांनी लागवडीसाठी लावलेला खर्च निघणे देखील अशक्‍य आहे.
-धनंजय देशमुख, समन्‍वयक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, अमरावती विभाग

अन्यथा हक्काच्या मदतीसाठी आंदोलन
राज्यभर पावसाने थैमान माजवीत शेतकऱ्यांच्‍या हाती आलेले पीक नेस्तनाबूत करून टाकलं. शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात 100 टक्‍के ओला दुष्काळ असून, अवकाळी पावसाच्या फटक्याने शेतकरी संपूर्णपणे खचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 50 हजाराची हेक्टरी मदत द्या, अशी मागणी आम्ही स्वाभिमानीकडून केली होती. पण राज्यपालांनी 8 हजार मदत हेक्टरी जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भीक नाही तर भरीव मदत द्या, अशी मागणी आमची आहेच. राज्यपाल यांनी शेतकऱ्याचं खरं दुखणं समजून घ्यावे, अन्यथा आमच्या हक्काच्या मदतीसाठी राज्यपाल यांच्या बंगल्यावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल.
-कैलास फाटे, जिल्‍हाध्यक्ष, स्‍वाभिमानी शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com