या जिल्ह्यातील बाजारात चिखल तुडवत करावी लागते भाजीची खरेदी

मिलिंद उमरे
Monday, 13 July 2020

जनता कर्फ्यूच्या काळात काही दिवस स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी खुल्या सभागृहात शेतकरी बाजार म्हणून भाजीबाजार भरविण्यात आला. पण, काही दिवसांतच हे मैदान अपुरे पडून गर्दी वाढू लागली. त्यामुळे हा जिल्हा क्रीडांगणाच्या प्रशस्त जागेवर भाजीबाजार सुरू करण्यात आला. पण, या मैदानावर पावसामुळे चिखल होत आहे. या चिखलाने विक्रेत्यांना येथे बसणे कठीण होत असून ग्राहकांनाही चिखल तुडवतच खरेदी करावी लागत आहे.

गडचिरोली : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील रविवारचा आठवडी बाजार बंद करून स्थानिक प्रेक्षागार मैदानावर दैनंदिन भाजीबाजार सुरू करण्यात आला. पण, पावसाच्या सरी कोसळताच या भाजीबाजारात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ग्राहक व विक्रेत्यांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देश, राज्यासह जिल्ह्यात लॉकडाउन झाल्यानंतर नागरिकांची गर्दी होऊन शारीरिक दुरस्थतेचा नियम मोडू नये व कोरोनाचा प्रकोप वाढू नये, यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. पूर्वी स्थानिक कारगिल चौकात दर रविवारी आठवडी बाजार भरायचा. तसेच दैनंदिन गुजरीतही रोज गर्दी असायची.

बाजार रविवारी बंद

त्यामुळे जनता कर्फ्यूच्या काळात काही दिवस स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी खुल्या सभागृहात शेतकरी बाजार म्हणून भाजीबाजार भरविण्यात आला. पण, काही दिवसांतच हे मैदान अपुरे पडून गर्दी वाढू लागली. त्यासोबतच कोरोना संसर्गाचा धोकाही वाढू लागला. त्यामुळे हा जिल्हा क्रीडांगणाच्या प्रशस्त जागेवर भाजीबाजार सुरू करण्यात आला. हा भाजीबाजार दैनंदिन असून फक्त रविवारी बंद असतो. येथे भरपूर जागा असल्याने विक्रेते आधी आनंदले होते. उन्हाळ्याचा काळही त्यांच्यासाठी बरा गेला. पण, आता पावसाळा सुरू होताच त्यांच्या समस्या सुरू झाल्या.

चिखल तुडवत होते खरेदी

अनेक विक्रेते गरीब आहेत. त्यांना साधा ताडपत्रीचा तंबू उभारणेही शक्‍य नाही. म्हणून अनेकांनी उन्हाळ्यात प्रखर उन्हाचे चटके सहन करत कसाबसा व्यवसाय केला. आताही ते पावसात भिजत भाजी विक्री करत आहेत. पण, या मैदानावर पावसामुळे चिखल होत आहे. या चिखलाने विक्रेत्यांना येथे बसणे कठीण होत असून ग्राहकांनाही चिखल तुडवतच खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे बाजारात अव्यवस्थेचे वातावरण दिसून येत आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने व नगर परिषदेने या समस्येच्या निवारणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विक्रेते व ग्राहकांनी केली आहे.

जाणून घ्या : नक्षलवादी असल्याचे सांगून ते सर्रास लुटायचे प्रवाशांना! नेमके ते होते कोण?

तो निर्णय ठरला योग्य

सुरुवातीला प्रेक्षागार मैदानावरील हा दैनंदिन भाजीबाजार दररोज सुरू ठेवण्यात आला होता. पण, गडचिरोलीकरांना नेहमी रविवारच्या आठवडी बाजारातून आठवडाभराचा बाजार खरेदी करण्याची सवय आहे. ही त्यांची सवय जात नव्हती. प्रेक्षागार मैदानावरील भाजीबाजार दैनंदिन बाजार असतानासुद्धा बहुतांश ग्राहक रविवारची भाजी खरेदीसाठी यायचे. त्यामुळे इतर दिवशी ओस दिसणारा हा भाजीबाजार रविवारी गर्दीने फुलून जायचा. पण, जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी रविवारी सारीच दुकाने व बाजार बंद करण्याचे आदेश दिल्याने आता रविवारी हा बाजार बंद असतो.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The kingdom of mud everywhere in the vegetable market at gadchiroli