हा शेतकऱ्यांचा सन्मान की थट्टा?; पैसे बँक खात्यातून गेले परत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

नागपूर - कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने ‘किसान सन्मान निधी योजना’ घोषित केली. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने वेगाने अंमलबजावणी करून तातडीने शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमाही केला. मात्र जमा झालेले पैसे तितक्‍याच वेगाने खात्यातून परत गेल्याने सरकार शेतकऱ्यांचा सन्मान करत आहे की थट्टा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. विदर्भातील भंडारा व अमरावती जिल्ह्यात असा प्रकार पुढे आला आहे.

नागपूर - कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने ‘किसान सन्मान निधी योजना’ घोषित केली. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने वेगाने अंमलबजावणी करून तातडीने शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमाही केला. मात्र जमा झालेले पैसे तितक्‍याच वेगाने खात्यातून परत गेल्याने सरकार शेतकऱ्यांचा सन्मान करत आहे की थट्टा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. विदर्भातील भंडारा व अमरावती जिल्ह्यात असा प्रकार पुढे आला आहे.

अमरावती जिल्ह्याच्या बोर्डी (ता. अचलपूर) येथील सुनील पंजाबराव गाठे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये क्रेडिट झाले होते, मात्र बॅंकेच्या पुस्तकात एन्ट्री केली असता त्या खात्यातून डेबिट झाल्याचेही दिसून आले. तालुक्‍यातील इतरही शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे वापस घेतल्याची चर्चा आहे. भंडारा जिल्ह्यातील कोका (जंगल) येथील काही शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला. स्टेट बॅंकेत खाते असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमाही झाले. परंतु, सोमवारी पैसे काढण्यास गेलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातून रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले. अनिराम काशीवार यांनी तक्रार केली होती. मंगळवारी खात्यात पुन्हा रक्कम जमा झाली. तांत्रिक दोषामुळे हा प्रकार घडल्याचे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांमध्ये धाकधूक
विदर्भातील काही भागात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यातून पैसे परत गेल्याच्या घटना पुढे आल्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यात पैसे परत जाण्याच्या तक्रारी नसल्या तरी शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. गडचिरोलीत पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी ६५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत दोन हजार शेतकऱ्यांना लाभ दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे. 

वर्ध्यातील सात हजार ५६० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. गोंदिया जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असला तरी आपल्या खात्यातील पैसे तर परत गेले नाही ना? या चिंतेपोटी शेतकरी बॅंकेत पासबुक तपासण्यासाठी गर्दी करत आहेत.

याद्या तलाठ्यांकडेच
दोन हेक्‍टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी किसान सन्मान योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यांच्या याद्याही तयार झालेल्या आहेत. मात्र, रक्कम पाठविताना आधार अपडेट नसणे, चुकीचा मोबाईल क्रमांक, पासबुक व इतर कागदपत्रांत नावांची तफावत असल्याने त्यांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक शेतकऱ्यांची नावे ‘रिजेक्‍ट’ झाल्याने दुरुस्तीसाठी याद्या पुन्हा तलाठ्यांच्या हाती आल्या आहेत.

माझ्या खात्यात दोन हजार जमा झाले होते. मात्र, बॅंक पुस्तकात एन्ट्री केली असता त्यामधून वापस घेतल्याचे दाखविण्यात आले. बॅंकेकडे चौकशी केली असता याच्याशी बॅंकेचा संबंध नसल्याचे सांगितले.
- सुनील पंजाबराव गाठे, बोर्डी (जि. अमरावती)

Web Title: kisan sanman fund scheme farmer money bank account