पतंग उडवा; पण जरा जपून

पतंग उडवा; पण जरा जपून

नागपूर - अवघ्या दहा दिवसांवर असलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पण, पतंग उडविताना योग्य काळजी न घेतल्यास प्राणाला मुकावे लागू शकते. आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये, याकरिता पतंगप्रेमींनी आवश्‍यक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. 

पतंग उडविण्याचा मोह सर्वांनाच होतो. मात्र, शहरात वीज वितरणाच्या लघु व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंचा खांबांवर अडकतात. तो काढण्यासाठी काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोटचा वापर करतात. हे करताना जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्‍यता असते. हा प्रकार जिवावर बेतू शकतो. बरेचदा अडकलेल्या पतंगीचा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही विजेचा भीषण अपघात होण्याची दाट शक्‍यता असते. मांजा ओढताना तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन  शॉर्टसर्किट होण्याची, प्राणांतिक अपघात होण्याची तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचा  प्रकारही घडू शकतो. सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा  मांजा वीजप्रवाहित तारांच्या संपर्कात आल्यास किंवा रोहित्र वा वीज वितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहित होऊन अपघाताची दाट शक्‍यता आहे, असेही महावितरणतर्फे कळविण्यात आले. 

दुर्दैवी मृत्यू
काही दिवसांपूर्वी नागपुरात सद्‌भावनानगर येथील देवांशू विजय अहेर या ११ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. तो मिरे ले-आउट येथील आजोबांच्या घरावर पतंग उडवीत असताना उच्च दाबाच्या वीज तारांना स्पर्श झाल्याने ही घटना घडली होती. दुसऱ्या एक घटनेत खामला येथील झोपडपट्टीतील राजेश पटेल या १८ वर्षीय तरुणाचा वीज तारांना अडकलेला पतंग काढण्याच्या नादात मृत्यू झाला होता. अशा घटना टाळण्यासाठी योग्य सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले.

लक्षात ठेवा
- तारांवर अडकलेला पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.
- वीज तारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये.
- वीजतारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.
- पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.
- पतंग उडविताना मुलांवर पालकांनी लक्ष द्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com