प्रेयसीला टोमणा मारल्याने प्रियकराने चाकूने केले १४ वार

Knief Attack
Knief Attack

नागपूर - नूडल्सच्या ठेल्यावर उभ्या असलेल्या युवतीच्या तोकड्या कपड्यावर दोन युवकांनी टोमणा मारला. यामुळे तिच्या प्रियकराचा राग अनावर झाल्याने दोन्ही युवकांवर चाकूने तब्बल १४ घाव घातले. या हल्ल्यात दोन्ही युवकांचा थोडक्‍यात जीव वाचला. दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी रात्री दहा वाजता अंबाझरीत घडली.

अक्षय सार्वे (२७) आणि अंशुल लांडगे (२०, दोन्ही रा. जुना फुटाळा, भरतनगर) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपी राहुल शेवतकर (२३, रा. काटोल) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली.   

पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षयचे बी. कॉम.पर्यंत शिक्षण झाले असून सध्या तो एका खासगी कंपनीत काम करतो. रविवारी रात्री अक्षय आणि त्याचा मित्र अंशुल दोघेही रविनगर चौकाजवळील एका चायनीज ठेल्यावर गेले. दरम्यान, आरोपी राहुल हा त्याच्या प्रेयसीसोबत चायनीज विक्रेत्याकडे आला. त्याच वेळी अक्षय आणि अंशुल हे खाद्य पदार्थाच्या प्रतीक्षेत होते.

छोट्या कपड्यात असलेल्या युवतीवर दोघांनीही टोमणा मारला. यावरून राहुल संतापला त्याने अक्षय, अंशुल यांच्याशी वाद घातला. लगेच जवळील चाकूही काढला. मात्र, चायनीज विक्रेत्याच्या मध्यस्थीमुळे भांडण थांबले. 
काही वेळातच राहुल पुन्हा त्या दोन मित्रांवर तुटून पडला. अक्षय रक्तबंबाळ असतानाच त्याने फोन करून या घटनेची घरच्यांना माहिती दिली. लगेच कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे अक्षय आणि अंशुलचा जीव वाचला. त्या दोघांनाही जवळच असलेल्या दंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी अक्षयवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता दोघांचीही प्रकृती धोक्‍याबाहेर आहे.  

प्रेयसीला लागला चाकू
राहुलने अक्षयवर चाकूने हल्ला केला असता तो वार चुकला आणि मागे उभ्या असलेल्या प्रेयसीच्या हाताला लागला. प्रेयसीच्या हातातून रक्त आल्यामुळे राहुल आणखीनच संतापला. त्याने डोक्‍यात भूत संचारल्यासारखा हल्ला करीत दोन्ही युवकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेच प्रेयसीला घेऊन दवाखान्यात गेला. 

दोन तासांत आरोपी अटकेत 
पोलिसांनी आरोपीबाबत चायनीस विक्रेत्याची चौकशी केली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. पोलिसी खाक्‍या पाहताच त्याने राहुलचा पत्ता सांगितला. राहुलचा मोठा भाऊ एका पतसंस्थेत डेली कलेक्‍शनचे काम करतो. रविवारी त्याच्याऐवजी राहुल कलेक्‍शनसाठी आला. चायनीज विक्रेत्याचे पतसंस्थेत खाते असल्याने त्याच्याकडे तो कलेक्‍शनसाठीच आला असल्याचे चायनीज विक्रेत्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांचे एक पथक काटोलला रवाना झाले आणि रात्रीच राहुलला पकडून ठाण्यात आणले. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com