कोमेजल्या हरतालिका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

अख्ख्या मजूर वस्तीवर पसरली शोककळा, एकही चूल पेटली नाही!

अख्ख्या मजूर वस्तीवर पसरली शोककळा, एकही चूल पेटली नाही!

नागपूर - इच्छित पती मिळावा किंवा अखंड सौभाग्य टिकावे म्हणून भगवान शंकराची आराधना करण्याचे व्रत हरतालिका म्हणून साजरे करण्यात येते. महिला या दिवशी उपवास करून शंकराला प्रसन्न करण्यासाठी हरतालिकेची पूजा-अर्चना करतात. हिंगणा तालुक्‍यातील सावंगीवासींसाठी मात्र रविवारचा (ता. चार) दिवस दुर्भाग्याचाच ठरला. दुःखाची काळी छाया घेऊनच सूर्य उजाडला. पुजनासाठी गेलेल्या युवतींसाठी नाला कर्दणकाळ ठरला. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या वस्तीवर काळोखाचे ढग दाटले. पूजा डडमल (वय १८), प्रिया राऊत (१७), प्रणाली राऊत, पूनम डडमल (१६), जान्हवी चौधरी (१४) यांच्यासह मंदाताई गोमासे या पन्नास वर्षीय महिलेचा नाल्याच्या पाण्यात बुडून अंत झाला. सगळी वस्ती शोकसागरात बुडाली.

खड्डा बुजविला असता, तर सहा महिलांचे प्राण गेले नसते. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

-कृपाल तुमाने, खासदार, रामटेक

मृतांचे कुटुंबीय हातमजुरी करून उदरनिर्वाह करीत असल्यामुळे त्यांना अधिकाधिक शासकीय मदत देण्यात यावी; अन्यथा गावकऱ्यांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल.

-उज्ज्वलाताई बोढारे, जि. प. सदस्य

मृतांच्या नातेवाइकांना पुरेपूर मदत मिळायला हवी. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई व्हावी; अन्यथा त्यांच्या बाजूने आम्ही शासनाशी लढा देऊ.

-बाबाराव आष्टणकर, माजी सत्तापक्ष नेते

अतिशय दुर्दैवी घटना आहे. याला कारणीभूत असलेल्यांची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना योग्य तेवढी मदत मिळेल यासाठी प्रयत्नरत राहणार.

-दिलीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते

धार्मिक उत्सवांमध्ये प्रशासन आवश्‍यक उपाययोजना करीत नाही. एखादा अपघात झाल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडतात. अपघात होऊच नये, यासाठी कुठलीच यंत्रणा किंवा उपाययोजना केली जात नाही. अशा घटनांपासून सगळ्यांनी धडा घ्यावा. यासाठी कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

-रवींद्र दरक, सामाजिक कार्यकर्ते

आमच्या गावावर आलेले अरिष्ठ मोठे आहे. प्रशासनाने तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांच्या घरातील सदस्याचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने प्रत्यक्षात मदत करावी. मृत युवतीचे कुटुंब आमच्याकडे नेहमी कामास असायचे. 

-बल्लूजी येनूरकर, नागरिक

ग्रामस्थांच्या मागण्या

मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत द्यावी.

घटनेस कारणीभूत असलेल्या दोषींची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. 

भविष्यात अशा दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घेण्यात यावी.

चौकशीचा अहवाल तीन दिवसांत

सावंगी नाल्यावरील खोल खड्ड्यात सहा महिलांचा मृत्यू झाल्याच्या कारणांचा तपास करून यात दोषी असलेल्यांवर कडक कारवाई व्हावी म्हणून चौकशी समिती नेमण्यात आली. समितीत पोलिस उपायुक्‍त दीपाली मासिरकर, माजी आमदार विजय घोडमारे, काँग्रेस नेते बाबा आष्टणकर, जि. प. सदस्या उज्ज्वलाताई बोढारे, शिवसेनेचे जगदीश कन्हेर यांचा समावेश आहे. ७ सप्टेंबरपर्यंत समिती अहवाल देणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

२० फुटांचा खड्डा ठरला कर्दनकाळ

सावंगी गावालगत नाला असून जि. प. लघुसिंचन विभागाने सिमेंट बंधारा बांधला आहे. उन्हाळ्यात बंधाऱ्याचे काम करण्यात आले. कामावर पाणी वापरासाठी कंत्राटदार सावरकर यांनी नाल्यात जेसीबीने १५ ते २० फूट खोल खड्डा केला. बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर खड्डा बुजविला नाही. याच खड्ड्यात बुडून युवती व महिलेचा अंत झाला. हा खड्डा वेळीच बुजविला असता, तर ही दुर्दैवी घटना घडली नसती. मागील वर्षीही एक महिला याच ठिकाणी पाण्यात बुडत असताना तिला वाचविण्यात आले. मागील घटनेपासून प्रशासनाने धडा घेतला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांचा संताप 

घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्‍त केला. मृताच्या नातेवाइकांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यात यावी व दोषींवर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मृतदेह हलविण्यास मनाई केली. पालकमंत्र्यांनी मदतीचे आश्‍वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन  मागे घेतले. पालकमंत्र्यांनी व्यक्‍तिगत मदत म्हणून २५ हजार रुपयांची घोषणा केल्यानंतर  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांची तात्पुरती मदत दिली. 

Web Title: komejlelya hartalika