कृष्णा खोपडेंची हॅट्‌ट्रीक मात्र मताधिक्‍य घटले |Election result 2019

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

नागपूर शहरात भाजपसाठी सर्वाधिक "सेफ' मतदारसंघ म्हणून पूर्व नागपूर ओळखल्या जात होता. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पूर्व नागपुरात सलग तीनदा कमळ फुलवित आमदार कृष्णा खोपडे यांनी विजयाची हॅटट्रीक केली.

नागपूर : एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पूर्व नागपुरात सलग तीनदा कमळ फुलवित आमदार कृष्णा खोपडे यांनी विजयाची हॅटट्रीक केली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मताधिक्क घटले तरी, आमदार खोपडे यांनी 24 हजार 17 मताधिक्‍क्‍यासह सोपा विजय मिळविला. त्यांना 1 लाख 03 हजार 992 मते तर कॉंग्रेसचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांना 79 हजार 995 मते मिळाली. 
नागपूर शहरात भाजपसाठी सर्वाधिक "सेफ' मतदारसंघ म्हणून पूर्व नागपूर ओळखल्या जात होता. भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या दमदार फळीमुळे यामुळे लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 75 हजारांहून अधिक मताधिक्‍य दिल्याने विधानसभेत सर्वाधिक मताधिक्‍क्‍याने आमदार कृष्णा खोपडे निवडून येतील असा कयास जवळपास सर्वांनीच बांधला होता. त्यातच गेल्या चार वर्षांपासून मतदारसंघात कॉंग्रेसचा झेंडा हाती घेऊन सतत झटणारे ऍड. अभिजित वंजारी यांच्याऐवजी पारडीचे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांना पक्षाने तिकीट दिल्याने खोपडे यांचा विजय अधिकच सुकर झाल्याचे चित्र होते. त्यामुळे भाजपकडून "अबकी बार एक लाख पार' अशा घोषणा प्रचारादरम्यान देण्यात येत होत्या. यानुसार हनुमाननगर येथील ईश्‍वरराव देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात पार पडलेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आमदार खोपडे यांनी आघाडी मिळविली होती. प्रत्येक फेरीअखेर ती आघाडी वाढत असल्याने खोपडेंना विजय सुकर झाला. 
मात्र, पारडी, पुनापूर, विजयनगर, भरतवाडा, डिप्टीसिग्नल, मिनिमातानगर यासारख्या परिसरात भाजपविरुद्ध रोष असल्याचे दिसून आले. त्याचाच फटका मतदानात भाजपला बसल्याचे दिसून आले. या परिसरातून गेल्या निवडणुकीत मताधिक्क मिळविणाऱ्या भाजपला या परिसरातून पिछाडीवर राहावे लागले. कॉंग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांनी चांगलीच मुसंडी मारली. त्यामुळेच गेल्यावर्षी 50 हजारावर थांबलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवाराने यंदाच्या निवडणुकीत 79 हजार 975 मते मिळविली. त्यांच्या मतांची टक्केवारी 40.38 इतकी होती. यामुळे येणाऱ्या काळात भाजपला धोक्‍याची घंटा मानल्या जात आहे. 
बसप, वंचित नापास 
राज्यात लोकसभा निवडणुकीत आपले वर्चस्व दाखविणाऱ्या बहुजन वंचित आघाडीला पूर्व नागपुरात फारसा प्रभाव पाडता आला नाही. यावेळी पूर्व नागपुरातून वंचित आघाडीचे मंगलमूर्ती सोनकुसरेंना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, ते 4 हजार 338 मतासह चौथ्या क्रमांकावर राहीले. त्यांच्या मतांची टक्केवारी 2.18 इतकी होती. बहुजन समाज पक्षालाही (बसप) फारसा प्रभाव पाडता आला नाही. बसपचे सागर दामोदर लोखंडे यांना 5 हजार 284 मते मिळाली. त्यांना मतांची टक्केवारी 2.66 इतकी होती. ते तिसऱ्या स्थानावर होते. त्यामुळे पूर्व नागपुरात दोन्ही पक्षाला मतदारांनी नाकारल्याचे चित्र होते. 
3 हजार 460 नागरिकांची नोटाला पसंती 
"सेव्ह नेशन सेव्ह मेरिट' या संघटनेद्वारे आरक्षणाविरोधात भूमिका घेतली होती. या संघटनेद्वारे विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यातूनच पूर्व नागपुरात जवळपास 3 हजार 460 म्हणजेच 1.74 टक्के मतदारांनी "नोटा'ला पसंती दिली. 
नऊ मशीन बंद, व्हीव्हीपॅटमधून मोजणी 
पूर्व नागपूर विधानसभेच्या निवडणुकीत मतदानादरम्यान 9 ईव्हीएम मशीन "क्‍लोज' करण्यास विसरल्यामुळे मतमोजणीमध्ये 9 ईव्हीएम मशील बाजूला ठेवण्यात आल्यात. यानंतर सर्वांत शेवटी या ईव्हीएममधील मते व्हीव्हीपॅटच्या आधारे मोजण्यात आल्यात. त्यानंतर त्याची घोषणा निवडणूक अधिकारी शीतल देशमुख यांनी केली. 
विकास कामांचा विजय ः कृष्णा खोपडे 
गेल्या दहा वर्षांत आमदार म्हणून कोट्यवधींची विकासकामे मतदारसंघात केली. त्याच विकासकामांच्या भरोशावर जनतेने निवडून दिले आहे. त्यांचे मनस्वी आभार मानत असून सुरू असलेल्या विकासकामांना अधिक गती देणार असल्याची प्रतिक्रिया विजयाची हॅट्‌ट्रीक साधणारे आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली. गेल्या निवडणुकीपेक्षा मताधिक्क घटले आहे हे मान्य आहे. मात्र, नेमकी चूक काय झाली याचा शोध घेणार. कदाचित आम्ही आपल्या पक्षाची विकासकामे अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचू शकलो नसल्याने हा फटका बसला असावा.
उमेदवार मिळालेली मते 
कृष्णा खोपडे (भाजप)- 1,03,992 
पुरुषोत्तम हजारे (कॉंग्रेस) - 79,975 
सागर लोखंडे (बसप) - 5,284 
मंगलमूर्ती सोनकुसरे (वंचित) - 4,338 
गोपालकुमार कश्‍यप (अपक्ष)- 535 
बबलू गेडाम - (अपक्ष) - 487 
विलास चरडे (अपक्ष) - 357 
अमोल इटनकर - (अपक्ष)213 
नोटा - 3,460 
एकूण मते - 1,98,209 
कृष्णा खोपडे (विजयी) -24,017 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishna Khopde hat-trick, however, fell short of the vote