प्रकाशही फिरकला नाही आमच्या वस्तीत!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

काटोल - गावात राहायला जागा नाही. म्हणून लागूनच असलेल्या शेतात परिश्रमाने स्वतःचे घर बांधून काही मंडळींसह वास्तव्यास आलो. आमच्या कुटुंबात आठ बालके आहेत. अनेकदा वीजजोडणीची मागणी केली. दोन वर्षांपासून चकरा मारतोय. पण उपयोग नाही. आमच्या वस्तीत ‘प्रकाश’ फिरत नसल्यामुळे अंधारात अनेक समस्यांशी सामना करीत दिवस काढावे लागतात, अशा प्रतिक्रिया आहेत काटोल शहरापासून काळोख्या वस्तीत राहणाऱ्या ग्रामस्थांच्या. 

‘गाव तिथे वीज’ असे शासनाचे धोरण आहे. परंतु शासनाच्या धोरणाचा फज्जा उडविण्याचे प्रशासनाचे धोरण मात्र अजूनही कायम आहे. येथून काही अंतरावर असलेल्या कुकडीपंजारा गावातील लोकांनी वीज महावितरण मंडळाला वीजजोडणीची मागणी केली. पण त्यांना जोडणी मिळाली नाही.

शाळेत जाणारी गोंडस मुलं रात्री अभ्यासापासून वंचित राहत आहेत. काही मीटरवरून वीजपुरवठा होऊ शकतो. परंतु अजूनही तशी हालचाल दिसत नाही. २०१६ ला या परिवारांनी ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन वीज वितरण मंडळाला ‘सिंगल फेज’ वीज देण्याची मागणी केली होती. सर्व कागदपत्रे पुरविली. अनेकदा कार्यालयाच्या चकरा मारल्या. परंतु अनेकदा वेळ मारून नेण्यात येत असल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. याच गावाला रोड ओलांडून ढाब्याला वीजपुरवठा देण्यात येत आहे, मग आम्हाला का नाही, असा संतप्त सवाल या नागरिकांनी केला आहे.

गावात राहायला जागा नसल्याने मी येथेच घर बांधून राहण्याचा निर्णय घेतला. जवळपास अडीच वर्षांपासून येथे राहतो. ग्रामपंचायतीचा कर मी नियमित भरतो. गावाला लागूनच असल्यामुळे वीज वितरण कंपनीला अगदी काही अंतरावरून वीजपुरवठा करण्यास हरकत काय, हे कळायला मार्ग नाही. 
- शरद विनायकराव गेडाम

रात्रीच्या वेळेला सर्वत्र अंधार राहत असल्याने आम्ही सर्व घरांतील मंडळी बाहेर येऊन बसतो, परंतु लहान मुले असल्याने विंचूकाट्यांपासून नेहमीच भीती वाटते. 
- शांताबाई नेहारे

ही बाब आमच्या लक्षात असून डीपीडीसी अंतर्गत ते कार्य पूर्णत्वास येणार आहे. त्यांच्या अडचणींची जाण ठेवून सतत पाठपुरावा सुरू आहे. येत्या ४ चार महिन्यांत त्यांना वीजपुरवठा दिला जाईल.
- श्री. घाटोळे, मुख्य कार्यकारी अभियंता

Web Title: kukadipanjara village electricity light