आर्थिक विवंचनेतून दाम्पत्याची आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून दाम्पत्याची आत्महत्या

नागपूर - बचतगटाचे पैसे परत देऊ शकत नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सुरेंद्रगड येथील गौरखेड कॉम्प्लेक्‍सजवळ राहणाऱ्या कुर्यवंशी दाम्पत्याने पहाटे चार वाजताच्या सुमारास फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. 

दिनेश हिरामण कुर्यवंशी (वय ५०) आणि योगिता दिनेश कुर्यवंशी (वय ४५) असे दाम्पत्याचे नाव आहे.

बुधवारी सकाळी दोघांचाही मृतदेह तलावात तरंगताना आढळला. दहा वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोघांचाही मृतदेह बाहेर काढला. मेयो रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कुर्यवंशी दाम्पत्यांना अमर (वय २१) आणि अनंत (वय १८) अशी दोन मुले आहेत. अमर हा जेडी अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकतो, तर अनंत बारावीला आहे. दिनेश फ्रेण्डस कॉलनीच्या रस्त्यावर पानठेला चालवायचा, तर योगिता गृहिणी होती. पतीला मदत म्हणून तीसुद्धा कमाला टिफिन सर्व्हिसेस या नावाने ‘मेस’ चालवायची. 

त्यातूनच परिसरातील महिलांचे पाचशे, हजार रुपये जमा करून त्यांना वर्षभरात अधिकचे व्याज देऊन ते परत करायची. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून योगिताला आर्थिक फटका बसल्याने फंडातील पैसे खर्च झाले. याशिवाय ऐन दिवाळीच्या तोंडावर महिलांनी पैशांसाठी तगादा लावला होता. त्यामुळे दोघेही प्रचंड मानसिक तणावात होते. मंगळवारी (ता.११) दाम्पत्याने मुलांसोबत दसऱ्याचा सण साजरा केला. बुधवारी पहाटे त्यांनी फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. अद्याप अशी कुठलीही संशयास्पद बाब आढळून आलेली नाही, असे अंबाझरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांनी सांगितले.

गाडीवर ‘सुसाइड नोट’
बुधवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास योगिताने ‘सुसाइड नोट’ लिहिली. त्यात मुलांनो खूप शिका आणि मोठे व्हा, असे नमूद करून गाडीवर ती ‘नोट’ ठेवली. यानंतर ते दोघेही घरातून  निघून गेले. साडेचार वाजता अमर स्वच्छतागृहाकडे जाण्यासाठी उठला. तेव्हा बिछाण्यावर आईवडील दिसून आले नाहीत. इकडे तिकडे शोधले असता, गाडीवर त्याला कागद दिसला. त्याने  तो वाचला. तेव्हा त्यास धक्का बसला. त्याने लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला.  अंबाझरी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी फुटाळा तलाव परिसर गाठला. तिथे दोघांच्याही चपला फुटाळा तलावाच्या मध्यभागी आढळून आल्या. त्यानंतर पाण्यात शोध घेतला असता, दोघेही एकमेकाला बिलगलेल्या अवस्थेत होते. सकाळी दहा वाजता अग्निशमन विभागाने मृतदेह बाहेर काढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com