अतिदक्षता विभागापासून कामगार रुग्णालय दूर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

कामगार रुग्णालयात भूलतज्ज्ञ नाहीत. यामुळे गंभीर शस्त्रक्रियापासून हे रुग्णालय दुरावले. पॅथॉलॉजिस्ट नाहीत. यामुळे येथील रक्त चाचण्यांपासून तर इतर मलमुत्राच्या चाचण्यांना खासगी पॅथॉलॉजीमध्ये पाठवण्यात येते. सर्वाधिक कामगारांना क्षयाचे भय आहे.

 

नागपूर ः गेल्या पाच वर्षांत उपराजधानीसह विदर्भात कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची अर्थात विमाधारकांची संख्या दीड लाखावर पोहोचली. पाच लाखांवर कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची जबाबदारी सोमवारी पेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयावर आली आहे. ही बाब लक्षात घेत कर्मचारी विमा योजना मंडळाच्या वरिष्ठ राज्य वैद्यकीय आयुक्त डॉ. रेश्‍मा वर्मा यांनी कामगार रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर उपचाराचा दर्जा वाढविण्यासाठी मनुष्यबळासह अतिदक्षता विभाग तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले होते. चार वर्षांनंतरही येथे अतिदक्षता विभाग तयार झाला नाही.

कामगार रुग्णालयात भूलतज्ज्ञ नाहीत. यामुळे गंभीर शस्त्रक्रियापासून हे रुग्णालय दुरावले. पॅथॉलॉजिस्ट नाहीत. यामुळे येथील रक्त चाचण्यांपासून तर इतर मलमुत्राच्या चाचण्यांना खासगी पॅथॉलॉजीमध्ये पाठवण्यात येते. सर्वाधिक कामगारांना क्षयाचे भय आहे. परंतु, कामगार रुग्णालयात क्षयरोगतज्ज्ञ नाही. 13 विशेषज्ञांपैकी 5 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची 3 पदे रिक्त आहेत. असे असतानाही कामगार रुग्णालयात कामगारांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. परंतु, त्या तुलनेत उपचाराचा दर्जा नसल्याची बाब शासनदरबारी वारंवार पोचली जात आहे, परंतु याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. अलीकडे सोसायटी तयार केली आहे, परंतु त्या तुलनेत आधुनिकीकरणाकडे कामगार रुग्णालयांची वाटचाल सुरू झाली नाही. सध्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांच्या नेतृत्वात प्रसूतीतज्ज्ञ व इतर विशेषज्ञ रुग्णालयात कार्यरत आहेत. रुग्णसंख्या वाढली आहे. त्यांच्यावर उपचार होत आहेत. त्या भेटीत विविध विषयांवर कारखानदार तसेच कामगार प्रतिनिधी यांच्याशी वरिष्ठ वैद्यकीय आयुक्त डॉ. रेशमा वर्मा यांनी तासभर चर्चा केली होती, हे विशेष.

रेफरचे प्रमाण कमी होईल
डॉ. वर्मा यांनी कामगार रुग्णालयात तात्पुरत्या सेवेवर विशेषज्ञ उपलब्ध करून देण्यासंदर्भात काही तज्ज्ञांच्या मुलाखती त्यावेळी घेतल्या होत्या. यानंतर त्याचे काय झाले, हे कळायला मार्ग नाही. कामगार रुग्णालयात अतिदक्षता विभाग तयार झाल्यानंतर विशेषज्ञ उपलब्ध होतील आणि मेडिकलसह इतर खासगी रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण कमी होईल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Labor hospital away from high-alert department