उघड्याबोडक्‍या अंगाने राबतात उन्‍हात!

उघड्याबोडक्‍या अंगाने राबतात उन्‍हात!

नागपूर - सध्या ऊन प्रचंड तापतेय. उष्म्याचा पारा वर जातोय. पहाटेचा थोडासा वेळ वगळता, चोवीस तास गरम हवा. अशात भरउन्हात टोलेजंग इमारतींच्या उभारणीत लयबद्धतेने काम करणाऱ्या मजुरांना पाहताना प्रश्‍न पडतो की, हे ऊन ही लोकं कसे सोसत असतील? ऊन अंगावर झेलत, थंडी-पावसात भिजत काम करणाऱ्या या निसर्गाच्या लेकरांची व उघड्याबोडक्‍या अंगाने राबणाऱ्या माणसांची तुलना झाडांशीच करता येईल!

उन्हं असो, पावसाळा असो किंवा हिवाळा आपल्याला जागोजागी घरांचे व इतर बांधकाम सुरूच दिसते. डोक्‍याला काहीतरी बांधून त्यावर चुंबळ ठेवून अनेक मजूर काम करताना दिसतात. इमारतींवर स्लॅब पडत असताना त्यांच्या कामातील लयबद्धता बघण्यासारखी असते. एकाच्या हातातील सिमेंटनी भरलेली घमेलं दुसऱ्याच्या हाती सोपविताना ती तसूभरही कमी होत नाहीत. कामधंद्यासाठी मजुरांचे स्थलांतर होते. छत्तीसगड, सिवनी, बालाघाट आदी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात मजूर महाराष्ट्रात आणले जातात. घर बांधकाम असो किंवा इतर बांधकामांसाठी या आयात केलेल्या मजुरांचा वापर केला जातो.

उन्हातान्हात राबवून घेत तोकडा मोबदला दिला जातो. दोन-एक महिने घरीही जाता येत नाही. पोटाची खळणी भरण्यासाठी शहरात काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. उन्हात काम करून चार-दोन पैसे कसे वाचवता येतील याचाच विचार करीत असतो, अशी प्रतिक्रिया मुन्ना सरकार, तेजुमल यादव, मनोजकुमार शाहू, फुलचंद उईके, टीकेश्‍वरकुमार शाहू, सीताबाई यादव, समीलाल यादव आदींनी दिली.

जगण्याच्या या लढाईत ना उसंत ना मनाजोगती विश्रांती. आजारपणातही शांतपणे बसून राहता येत नाही. दुखणे अंगावर घेऊन कामे करावी लागतात. 
- छोटू कोल, हेल्पर.

छत्तीसगड, बालाघाट आदी ठिकाणांहून मजूर कामासाठी आणत असतो. मात्र, हे मजूरही फार दिवस टिकत नाही. दोन महिन्यांनी गावाकडे परत जातात आणि पंधरा दिवस येत नाही. पूर्वी पाच-सहा महिने गावी परत जात नव्हते. त्यांच्या राहण्याची व्यवस्था आम्हीच करून देतो. जेवणाचा खर्च व इलेक्‍ट्रिक बिल तेच भरतात. मजुरांना ३०० व ५०० रुपये मजुरी देणे योग्य वाटत नाही. त्यांना यापेक्षा जास्त मजुरी मिळाला हवी.
 - मनोज बिंग,  ठेकेदार.

शेतात काम नसल्यामुळे शहरात कामासाठी आलो आहे. दोन-एक महिन्यांनी परत गावी जाऊ. मिस्त्री असल्यामुळे दिवसाला ५०० रुपये मजुरी मिळते साहेब... कुलीला २००, तर हेल्परला ३०० रुपये मजुरी दिली जाते. कामाशिवाय दुसरा पर्याय नाही. ठेकेदाराने राहण्याची सोय केल्याने थोडी मदत झाली.
-अजित मस्करे, घरबांधकाम मिस्त्री.

सातवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. नोकरी मिळाली नाही. त्यामुळे शहरात कामासाठी आलो. ठेकेदाराकडे राहतो आणि दिवसभर काम करतो. उन्हाम काम करताना खूप त्रास होतो. मध्ये थोडी उसंत मिळते यातच समाधान मानतो.
-उमराव विश्‍वकर्मा, घरबांधकाम मिस्त्री.

बाहेरगावावरील मजूर पाच ते दहा वर्षांपासून माझ्याकडे कामाला आहेत. त्यांच्या राहण्याची सोय केली आहे. कधी-कधी त्यांना जास्तीचे शंभर दोनशे रुपये देत असतो. तासभर विश्रांती करीत असतात. काम करताना थोडाफार आराम केला तरी काही बोलत नाही. त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
- बी. एस. सिंगसरवर, ठेकेदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com