उन्हाळी धानाची मळणी व खरीप हंगामामुळे द्वारपोच योजनेला ग्रहण, काय?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

मोठ्या प्रमाणात होत असलेला धान्याचा काळाबाजाराला आळा घालण्यासाठी शासकीय गोदामातून धान्य पुरवठ्यासाठी तालुका स्तरावरच काही वाहनांचे कंत्राट दिल्याची माहिती आहे. या वाहनांमध्ये ट्रॅक्‍टरचा अधिक प्रमाणात समावेश आहे.

लाखांदूर (जि. भंडारा) : रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने द्वारपोच धान्य पुरवठा योजना आणली. मात्र, विहित कालावधीत धान्यपुरवठा करणारे वाहन उपलब्ध होत नसल्याने रेशन दुकानदारांसह लाभार्थ्यांची हेळसांड होत आहे. अन्न पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे या योजनेला ग्रहण लागले आहे.

लाखांदूर तालुक्‍यात 89 गावांचा समावेश आहे. येथील नागरिकांना धान्य पुरवठा करण्यासाठी एकूण 96 स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानांतून एपीएल, बीपीएल, अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना दरमहा तांदूळ, गहू, डाळ, खाद्यतेल, साखरेसह जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. या दुकानांना तालुका अन्नपुरवठा विभागाकडून धान्य पुरवठा केला जातो.

खरं आहे का : सुनेपेक्षा कार झाली मोठी

यापूर्वी स्वस्त धान्य दुकानदार स्वतः वाहनाची व्यवस्था करून तालुक्‍यातील शासकीय गोदामातून धान्याची उचल करीत होते. त्यानंतर आपल्या दुकानातून लाभार्थ्यांना धान्य वाटप करायचे. मात्र, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात होत असलेला धान्याचा काळाबाजाराला आळा घालण्यासाठी शासकीय गोदामातून धान्य पुरवठ्यासाठी तालुका स्तरावरच काही वाहनांचे कंत्राट दिल्याची माहिती आहे. या वाहनांमध्ये ट्रॅक्‍टरचा अधिक प्रमाणात समावेश आहे.

मात्र, मागील काही महिन्यांपासून तालुक्‍यात उन्हाळी धानाची मळणी व नंतर खरीप हंगामाच्या तयारीची कामे सुरू झाली आहे. यामुळे कंत्राटदारांची वाहने शेतीकामात गुंतली आहेत. तथापि, रेशन दुकानदारांना अन्नपुरवठा विभागाने धान्य पुरवठ्याचा आदेश होऊनही वाहने उपलब्ध होत नसल्याने धान्यपुरवठा झालाच नाही. यामुळे रेशन दुकानदारांसह लाभार्थ्यांची हेळसांड होत आहे.

या शिक्षकांवर का आली मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ...वाचा सविस्तर

प्रभावी उपाययोजनांची मागणी

सरकारने कोरोना परिस्थितीत शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरमहा दरडोई पाच किलो मोफत धान्यपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, अन्न पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहने उपलब्ध झाली नसल्याने विहित वेळेत लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध होत नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारच्या द्वारपोच योजनेला ग्रहण लागण्याची चर्चा आहे. याप्रकरणी सरकारने तत्काळ दखल घेऊन द्वारपोच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.

लाभार्थ्यांची कुठेही हेळसांड नाही

द्वारपोच योजनेतून विहित काळातच सर्व स्वस्त धान्य दुकानांना धान्यपुरवठा केला आहे. सरकारच्या निर्देशानुसार तालुक्‍यातील 66 दुकानांना मोफत धान्यपुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित दुकानांनासुद्धा धान्यपुरवठा सुरू आहे. या योजनेबाबत अद्याप कोणतीही तक्रार नसून लाभार्थ्यांची कुठेही हेळसांड होत नाही.
मनोज डाहारे,
तालुका अन्नपुरवठा निरीक्षक, लाखांदूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakhandur citizens do not get food grains at home

Tags
टॉपिकस
Topic Tags: