एजंटने पतसंस्थेलाच लावला चुना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

ग्राहकांच्या तक्रारीवरून संस्थाचालक व अभिकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने शहरातील अन्य 28 संस्थांच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात दुय्यम निबंधक कार्यालय असूनसुद्धा पतसंस्थांवर नियंत्रण नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 
 

उमरेड (जि. नागपूर) ः आजपर्यंत बॅंकेत सशस्त्र दरोडा घालून, बळजबरीने किंवा हिंसक पद्धतीने चोरी करून रोख पळविल्याच्या अनेक घटना घडल्याचे ऐकिवात आहे. परंतु, उमरेड शहरातील फ्रेंड्‌स एकता या पतसंस्थेत गेल्या 14 वर्षांपासून संस्थाचालक व खातेधारक यांच्यातील विश्‍वासू दुवा म्हणून समजल्या जाणाऱ्या एका अभिकर्त्याने खातेधारक व संस्थेचा विश्‍वासघात करत ग्राहकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून त्यांच्या नावाने परस्पर उचल करून लाखो रुपये गंडविल्याची घटना गुरुवारी (ता. 13) उघडकीस आली. या घटनेने अन्य पतसंस्थांच्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शहरातील अड्याळवाले ले-आउटस्थित 2000 पासून सुरू असलेल्या फ्रेंड्‌स एकता पतसंस्थेमध्ये एकूण चार अभिकर्ते आहेत. त्यापैकी देवानंद नामदेव आंबूलकर (वय 38, मकरधोकडा, ता. उमरेड) हा गेल्या 14 वर्षांपासून संस्थेत कार्यरत होता. तो स्थानिक असल्यामुळे त्याच्या गावातील दोनशेपेक्षा अधिक खातेदारांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवत 10 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंतचे दैनिक खाते उघडले. त्याच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे संस्थेचा व गावातील ग्राहकांचा त्याने अल्पावधीत विश्‍वास संपादन केला. 
नलिनी कैलास आंबूलकर, डॉ. रॉय, वैभव माटे, राहुल सहारे, रंगनाथ बोरीकर, सुनील शिंदे, सागर शिंदे यासारखे अनेक ग्राहक त्यांच्यामार्फत पतसंस्थेत बचत करायचे. मात्र, 13 नोव्हेंबर रोजी काही ग्राहक त्यांची दैनिक बचत खात्याची परिपक्वता तिथी संपल्यामुळे ठेवीची रक्कम उचल करण्याकरिता संस्थेत गेले, तेव्हा त्यांच्या नावे आधीच कर्ज घेतल्याच्या नोंदी असल्याचे लक्षात येताच सर्व ग्राहकांच्या खात्यांतसुद्धा अफरातफर झाल्याचे संस्थेत चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. या एजंटने प्रत्येक खातेधारकांच्या खोट्या सह्या करून त्यांच्या नावे कर्जाची परस्पर उचल केली. कुणाच्या खात्यावरून आकस्मिक स्वरूपाचे कर्ज काढले आहे. याशिवाय काहींच्या खात्याची परिपक्वता झाली. मात्र, रोख रक्कम परस्पर उचल करून तो पसार झाला. फरार असल्याचे कळताच ग्राहकांनी पोलिस ठाणे गाठले. ग्राहकांच्या तक्रारीवरून संस्थाचालक व अभिकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
या घटनेने शहरातील अन्य 28 संस्थांच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात दुय्यम निबंधक कार्यालय असूनसुद्धा पतसंस्थांवर नियंत्रण नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 
 
या घटनेची अद्याप कुठलीही तक्रार आली नसल्यामुळे याबाबत काहीही बोलता येणार नाही. मात्र, शहरातील अन्य पतसंस्थांवर आता काटेकोरपणे नियंत्रण ठेवले जाईल. 
-एच. डी. कुहीकर 
सहकार अधिकारी 
दुय्यम निबंधक कार्यालय, उमरेड 

ग्राहकांसोबत झालेल्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण होताच किती लाखांची फसवणूक झाली, हे लक्षात येईल. 
-विलास काळे 
पोलिस निरीक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakhs worth of rupees from the creditor of the credit society