सासरची आई : लक्ष्मीच्या पावलांप्रमाणेच सासु सुनेचे नातेही एकरूप 

मनीष मोहोड
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

कुटुंबात आई-बाबांनी इतके मैत्रिपूर्ण वातावरण निर्माण केले आहे की, या घरात सून म्हणून असल्याचा विसर पडतो. जन्मदात्यांकडून मिळणारा मायेचा ओलावा मला सासरीही तितक्‍याच आपुलकीने मिळतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात आईंनीच मला सोबत केली आहे. आम्ही एकमेकींना पूरक ठरल्याचे निशा यांनी सांगितले. 

कुटुंबातील स्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. याचाच अर्थ लक्ष्मीला आपण जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व आणि आदर घरातील स्रीला मिळायला हवा. नागपुरातील धनविजय कुटुंबातील सासू-सुना याही लक्ष्मीच्या दोन्ही पावलांप्रमाणेच एकरूप झाल्या आहेत. एकमेकींवरील विश्‍वास आणि प्रेमातून त्यांनी नाते जपले आहे. विजया आणि निशा धनविजय या सासू सुनेची जोडी खरेच लक्ष्मीरूप ठरावी इतकी विलोभनीय आणि आनंदी असल्याचे दिसून येते. 
कुटुंबातील मोठ्या मुलाचे लग्न करायचे म्हटले की, आईला विशेष काळजी असते. कारण मोठी सून घराला सांभाळून घेईल का, मुलाला प्रेम देईल का, सर्वांचे स्वभाव समजावून घेईल का, असे एक ना अनेक प्रश्‍न मुलाच्या आईच्या मनात असतात. विजया धनविजय रेल्वेत चांगल्या पदावर कार्यरत होत्या. मुलगाही पुण्यात चांगल्या हुद्यावर. आपल्या सालस मुलासाठी तितकीच सालस आणि हुशार असलेली निशा त्यांना पसंत आली. निशा स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये मोठ्या पदावर कार्यरत असल्याने, तिच्या नोकरीचा हेका तर घरात मिरवणार नाही अशी भीती लग्नातच अनेक नातेवाईकांनी व्यक्त केली होती. परंतु, निशाने सर्वांचा हा गैरसमज काही दिवसात पुसून काढला. बुद्धीने तल्लख असलेली निशा स्वभावाने मनमिळाऊ असल्याचे नातेवाईकांसह सासूच्या मैत्रिणींनीही मान्य केले. मुलाची नोकरी पुण्यात तर, सुनेची नागपुरात अशावेळी विजया यांनी सासू म्हणून सुनेसोबतच राहणे पसंत केले. बदली होईपर्यंत आणि बदलीनंतरही त्यांनी सुनेला कधीही एकटे सोडले नाही. यामुळे आमचे नाते अधिकच घट्ट झाल्याचे निशा धनविजय यांनी सांगितले. कुटुंबात आई-बाबांनी इतके मैत्रिपूर्ण वातावरण निर्माण केले आहे की, मला या घरात सून म्हणून असल्याचा विसर पडतो. जन्मदात्यांकडून मिळणारा मायेचा ओलावा मला सासरीही तितक्‍याच आपुलकीने मिळतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात आईंनीच मला सोबत केली आहे. माझी प्रसूतीची वेळ असो अथवा त्यांच्या शस्त्रक्रियेची. आम्ही एकमेकींना पूरक ठरल्याचे निशा यांनी सांगितले. 

माझ्या सासरच्या लोकांनी मला सुरुवातीपासूनच सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणूनच स्वीकारले. घरात मैत्रिपूर्ण आणि खेळीमेळीचे वातावरण असल्याने मलाही कधी आपण सून असल्याचे जाणवत नाही. सासू-सुनेच्या नात्यात असूनही आम्ही मनाने एकरूप झालो आहोत. 
- निशा पंकज धनविजय, सून. 

दोन्ही मुलेच असल्याने मुलीची कमतरता आयुष्यात भासत होती. परंतु, निशा कुटुंबात आली आणि तिने मुलीची कमी भरून काढली. तिला कधीही तिच्या नोकरीचा, तिच्या बुद्धीमत्तेचा गर्व नसतो. आमच्या कुटुंबात दुखात साखर मिसळावी तितकी सहज ती मिसळली आहे. 
- विजया विवनोद धनविजय, सासू. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Like Lakshmi's footsteps, Sasu Suna relationship is similar