...अन्‌ "नकोसा' ठरलीय "लकी' 

नागपूर - बुलेटवर स्वार डावीकडून ललिता, ‘नकोसा’ आणि भाग्यश्री या बाबर भगिनी.
नागपूर - बुलेटवर स्वार डावीकडून ललिता, ‘नकोसा’ आणि भाग्यश्री या बाबर भगिनी.

नागपूर - घराला कुलदीपक हवा, असं केवळ अडाणी व अशिक्षित लोकांनाच वाटतं असं नाही. शिकलेल्यांचीही तीच भावना असते. बाबर कुटुंबही त्याला अपवाद ठरलं नाही. दोन मुलींपाठोपाठ तिसरीही मुलगीच झाल्याने मुलाची ओढ असलेल्या मातापित्यांनी तिला "नकोसा' ठरविले. याच "नकोसा'च्या पाठोपाठ भाऊ झाल्यानंतर ती परिवारासाठी "लकी' ठरली. "नकोसा'नेही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ऍथलेटिक्‍समध्ये नाव कमावून बाबर कुटुंबाचे नाव रोशन केले. 

 सातारा जिल्ह्याच्या मान या तालुक्‍यातील मोही या छोट्याशा गावात जन्मलेल्या बाबर परिवारातील ललिताने नुकतीच रिओ ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून देशविदेशातील क्रीडाप्रेमींची मने जिंकली. ललिताला जयश्री आणि "नकोसा' या दोन बहिणी. दुसऱ्या क्रमांकाची बहीण जयश्री ही सोमवारपासून अजनी मैदानावर सुरू झालेल्या लोहमार्ग पोलिस विभागीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सध्या नागपुरात आली आहे. "सकाळ'शी बोलताना जयश्रीने "नकोसा' या नावामागचे रहस्य उलगडले. जयश्री म्हणाली, ललितादीदी आणि माझ्यानंतर तिसरीही मुलगीच झाल्याने आईबाबांना फार दु:ख झाले. मुलाची आस असल्याने त्यांनी धाकटीला "नकोसा' हे नाव दिले. तेव्हापासून याच नावाने "नकोसा' आमच्या परिवारात ओळखली जाऊ लागली. मात्र दोनच वर्षांनी "नकोसा'पाठोपाठ दिगंबर जन्माला आल्याने नको असलेली "नकोसा' सर्वांना हवीहवीशी वाटू लागली. भावाच्या जन्मानंतर "नकोसा'ला घरची मंडळी भाग्यवान समजू लागले. "नकोसा'नेही अन्य दोन बहिणींप्रमाणे ऍथलेटिक्‍समध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर झेप घेऊन बाबर परिवाराला नावलौकिक मिळवून दिला. सध्या मुंबई शहर पोलिसमध्ये कार्यरत असलेल्या "नकोसा'ला या नावाने हाक मारलेले आवडत नाही. त्यामुळे आता तिच्या सहमतीने हे नाव बदलून भाग्यश्री करण्याचा बाबर कुटुंबीयांनी निर्णय घेतला आहे. 

बाबर भगिनींचे पिता शिवाजी आणि आई निर्मला हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे (दोन काकांमिळून) दहा-बारा एकर कोरडवाहू शेती आहे. हा भाग दुष्काळग्रस्त असल्यामुळे बाबर कुटुंबाला हलाखीच्या स्थितीत दिवस काढावे लागले. मात्र, ललितापाठोपाठ, जयश्री आणि "नकोसा'ला नोकरी लागल्याने आता हळूहळू आमचे दिवस पालटू लागल्याचे जयश्रीने सांगितले. 25 वर्षीय जयश्रीने सोमवारी महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून स्पर्धेवर छाप सोडली. याच स्पर्धेत रेल्वे पोलिसमध्ये असलेल्या जयश्रीच्या पतीनेही (गुलाब पोळ) पुरुषांच्या पाच हजार मीटरमध्ये सोनेरी यश मिळविले, हे उल्लेखनीय. 
 

रिओ ऑलिपिंकनंतर बदलला माहोल 
रिओ ऑलिंपिकपर्यंत बाबर कुटुंबीयांतील लाडलीला (ललिता) केवळ बोटावर मोजण्याइतकेच क्रीडाप्रेमी ओळखत होते. मात्र, ऑलिंपिकमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर बाबर कुटुंबासोबतच तीन हजार लोकसंख्या असलेले "मोही' गावही प्रकाशझोतात आले. त्या रात्री ललिताची अंतिम लढत पाहण्यासाठी अख्खे मोही गाव जागे होते. ठिकठिकाणी लागलेल्या मोठमोठ्या स्क्रीन्स व टीव्हीवर गावकऱ्यांनी ललिताची कामगिरी "लाइव्ह' पाहिल्याचे जयश्रीने सांगितले. 27 वर्षीय ललिताने तीन हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. मात्र पदक जिंकण्यात तिला अपयश आले. रिओ ऑलिंपिकपासून एकूणच माहोल बदलल्याचे ती म्हणते. तब्बल 32 वर्षांनंतर भारतीय महिलेने ऑलिंपिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याचा पराक्रम केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com