पुनर्वसन गावातील 70 ते 80 टक्के नागरिकांना सातबाराचे वाटप

राजेश सोळंकी
मंगळवार, 22 मे 2018

पुनर्वसन ग्रस्त नागरिकांना त्यांना शासनाने वाटप केलेल्या भूखंडांचे केवळ पट्टे देण्यात आले होते. त्यांना स्वतःच्या प्लॉटचे हक्काचे 7/12  मागील सुमारे 17 वर्षांपासून मिळाले नव्हते. किचकट विषय असल्यामुळे कुणीही त्याला हात लावत नव्हते.

आर्वी (जि वर्धा) - आर्वी तालुक्यातील 18 पुनर्वसन गावातील 5058 पैकी 4 हजार 120 नागरिकांचे सातबारा तयार करुन त्यांना वाटपही करण्यात आले. तर निंबोली येथेही 80 टक्केचे वर सातबारा प्रकल्पग्रस्ताना वाटप शासकीय यंत्रणाने केले आहे.

सर्कसपुर व वाठोडाभाईपुर या गावाचे सातबाराचे या दोन महिन्यात वाटप होइल. जिल्हाधिकारी यांचेशी या विषयी सखोल चर्चा झाली असुन अनेक समस्याचे निराकरण झाले आहे, अशी माहिती तहसीलदार विजय पवार यांनी 'सकाळ' तालुका बातमीदाराशी बोलताना दिली.

पुनर्वसन ग्रस्त नागरिकांना त्यांना शासनाने वाटप केलेल्या भूखंडांचे केवळ पट्टे देण्यात आले होते. त्यांना स्वतःच्या प्लॉटचे हक्काचे 7/12  मागील सुमारे 17 वर्षांपासून मिळाले नव्हते. किचकट विषय असल्यामुळे कुणीही त्याला हात लावत नव्हते. आम्ही तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी या सर्वांनी ठरवून या विषयाचा निपटारा करावयाचे ठरविले. जुन्या याद्या शोधून काढून त्यांची जुळवाजुळव करणे, जुने नकाशे शोधुन काढणे, याद्यांशी जिल्हा पुनर्वसन कार्यालयाशी ताळमेळ घेणे, प्रत्यक्ष पुनर्वसनच्या ठिकाणी जाऊन प्लॉटच्या ठिकाणी कुणाचा ताबा आहे ते पाहून रजिस्टरमध्ये नोंद घेणे, याद्यांचे त्या गावात वाचन करणे, याद्यांशी रजिस्टरमधील नावांचा ताळमेळ घेणे, आक्षेप अर्ज मागवून त्यांचा योग्य निपटारा करणे, पुनर्वसन लेआऊटच्या सर्व्हे नंबरचे एकत्रीकरण करण्यासाठी त्याचे प्रस्ताव मा. जिल्हा अधिक्षक भूमिअभिलेख यांना पाठवून त्यांचे आदेश प्राप्त करुन त्याचा फेरफार घेऊन सर्व लेआऊटचे क्षेत्र एकाच सर्व्हे नंबरवर घेण्यासाठी फेरफार घेणे, पुनर्वसन प्लॉटचे कच्चे 7/12 तयार करणे, त्यांचा ताळमेळ जुळल्यावर संगणकीकृत 7/12 तयार करणे इत्यादी कामे तहसील कार्यालयातील सहकारी मंडळीच्या मदतीने पार पाडली आहेत. अशा प्रकारे 18 पुनर्वसन च्या गावातील 5058 7/12 पैकी आजपर्यंत 4120 7/12 तयार करण्यात आले आणि त्याचे नागरिकांना प्रत्यक्ष वाटप करण्यात आले आहे.

निंबोली पुनर्वसन बाबत तर वाखाणण्याजोगे काम झाले आहे. 80 % पेक्षा अधिक 7/12 चे यशस्वीपणे वाटप केवळ 8 महिन्यात करणे ही अशक्य वाटणारी बाब होती पण सर्वांच्या सहकार्यामुळे व कष्टामुळे ही कामगिरी कमी वेळात पार पडली आहे. आता केवळ सर्कसपूर आणि वाठोडा भाईपूर या गावातील प्लॉटबाबत रेकॉर्ड नुसार व नकाशा नुसार ताळमेळ होत नसल्याने त्याबाबत अहवाल वरिष्ठ कार्यलयास सादर करण्यात आला आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करुन ती समस्या सोडविण्यासाठी हे कार्यालय प्रयत्नशील आहे. आजच मा. जिल्हाधिकारी सरांच्या कक्षात या विषयावर सविस्तर चर्चा होऊन यातील काही समस्यांचे निराकरण झाले आहे. साधारणतः येत्या 2 महिन्यात या प्रश्नाची सोडवणूक होईल अशी खात्री आहे. अशी माहिती तहसीलदार विजय पवार यांनी 'सकाळ'ला दिली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Land Records Allotment Distributes to 70 to 80 residents in vardha