35 वर्षांपासून पंढरीची पायी वारी

चंद्रकांत श्रीखंडे
रविवार, 27 मे 2018

कळमेश्‍वर - तालुक्‍यातील कोहळी निवासी हभप तुकाराम लंगोटे महाराज आजमितीस वयाच्या ८५ वर्षांतसुद्धा श्री क्षेत्र धापेवाडा ते पंढरपूर असा १,०५० किलोमीटरचा प्रवास गेल्या ३५ वर्षांपासून अखंडपणे करताहेत.

कळमेश्‍वर - तालुक्‍यातील कोहळी निवासी हभप तुकाराम लंगोटे महाराज आजमितीस वयाच्या ८५ वर्षांतसुद्धा श्री क्षेत्र धापेवाडा ते पंढरपूर असा १,०५० किलोमीटरचा प्रवास गेल्या ३५ वर्षांपासून अखंडपणे करताहेत.

पदयात्रेतील पालखी चालक असलेले लंगोटे महाराज परिसरामध्ये उत्कृष्ठ संगीतकार, रायफल प्लेयर, दांडपट्टा मास्टर, कीर्तनकार, उत्कृष्ट नाडीतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. दरवर्षी गेल्या ३५ वर्षांपासून श्रीक्षेत्र धापेवाडा येथून सुमारे १०० वारकऱ्यांना घेऊन ५७ दिवस आषाढी एकादशीपर्यंत १,०५० किलोमीटरचा प्रवास करतात. दरदिवशी १३ किलोमीटरचा प्रवास केल्यावर एकूण ११४ गावांत मुक्काम ठोकतात. त्यांची पालखी यावर्षी २५ मे रोजी सुरू होणार असून, आषाढी एकादशीला पंढरपूर येथे संपणार आहे. 

८५ व्या वर्षीसुद्धा लंगोटे महाराजांमध्ये आजच्या तरुण पिढीला लाजवेल इतका उत्साह दिसून येतो. लंगोटे महाराज आजही आपल्या आहाराबाबत अत्यंत दक्ष असून आहारात पोळी, वरण व टोमॅटोची चटणी नित्यनेमाने सेवन करतात. बाहेर कुठेही कुठलाही आहार घेत नाही. पाणीसुद्धा पीत नाही, हे विशेष.

आजच्या तरुण पिढीबाबत बोलताना महाराज म्हणतात, कुठेच मानसन्मान, शिस्त दिसत नसल्याने आचारविचारांची फार मोठी उणीव पाहायला मिळते. अधिकांश तरुण मांसाहार तसेच विविध व्यसनांमध्ये अडकले आहेत. आहाराला फार मोठे महत्त्व असून त्यावर तुमचे आचार-विचार, मानसिकता अवलंबून असल्याचे ते सांगतात.

ग्रामसेवक ते विठ्ठलभक्‍त
लंगोटे महाराज वारकरी संप्रदाय असो की आणखी कुठलाही, त्यावर ते निस्वार्थपणे प्रबोधन करतात. कुठेही भागवत असो की एखादे कीर्तन, कुठल्याही मानधनाची अट न ठेवता कार्यक्रमाला हजर असतात. महाराज नाडीतज्ज्ञ असल्याने विदर्भातील दूरदूरपर्यंत विविध व्याधींवर नाडी परीक्षण करून औषधे देतात. महाराज १९६५ पासून सलग १३ वर्षे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. नंतरच्या काळात आध्यात्मिक पिंड असल्याने ते वारकरी संप्रदायाकडे वळले आणि त्यांचा प्रवास आजही निरंतर सुरू आहे.

Web Title: langote maharaj pandharpur wari last 35 years