महापालिका थकबाकीदारांवर उदार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नागपूर - आर्थिक संकटामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा ताण सहन करणाऱ्या महापालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून दुकानांचे भाडेच न देणाऱ्यांची थकीत रक्कम माफ करण्याचा अजब प्रस्ताव तयार केला आहे. भाडे न देता महापालिकेच्या तिजोरीला सुरुंग लावणाऱ्या दुकानदारांकडील थकीत 28 लाख 86 हजारांपैकी 24 लाख 15 हजार रुपये माफ करण्यात येणार आहे. 

महापालिकेचे मस्कासाथ चुना ओळ येथे तळमजल्यावर दुकानांचे 10 गाळे आहेत. या 10 दुकानांचे ए विंग, बी विंग व सी विंग असे वर्गीकरण करून 1994 पासून दुकानदारांना भाड्याने देण्यात आली होती. यातील ए विंगमधील तीन दुकानांचे प्रत्येकी 930, बी विंगमधील तीन दुकानांचे प्रत्येकी 1950, सी विंगमधील चार दुकानांचे प्रत्येकी 240 रुपये प्रतिमाह भाडे व दरवर्षी त्यात 20 टक्के वाढ असे निश्‍चित करण्यात आले होते. ए विंगमधील तीन दुकानांसाठी दुकानदारांनी प्रत्येकी 50 हजार, बी विंगमधील दुकानदारांनी तीन दुकानांसाठी प्रत्येकी 1 लाख तर सी विंगमधील चार दुकानांसाठी प्रत्येकी 12 हजार रुपये अनामत रक्कम महापालिकेकडे जमा केली होती. या दुकानदारांकडे 1 ऑक्‍टोबर 1994 ते मार्च 2015 या 21 वर्षांचे भाडे थकीत आहेत. या दुकानदारांनी थकीत शुल्क माफ करण्यासाठी निवेदन दिले होते. या दुकानदारांच्या प्रस्तावावरून थकीत भाडे माफ करण्यासाठी बाजार विभागाने या दुकानांची तपासणी केली. सर्वाधिक 1950 रुपये मासिक भाडे असलेली चारही दुकानांना शटर नसल्याने व्यवसाय सुरू नसल्याचा अहवाल तयार केला. एवढेच नव्हे सहा दुकानांना शटर असूनही ही दुकाने बंद असल्याचेही अहवालात नमूद करीत दुकानदारांना लाभ पोहोचविण्याचा अहवाल तयार केल्याचे सुत्राने सांगितले. महापालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत शोधून आर्थिक स्थिती भक्कम करण्याची गरज असताना 24 लाखांची माफी कुठल्या कारणाने देण्यात येत आहे? सत्ताधाऱ्यांच्या दबावात तर हा प्रस्ताव तयार केला नाही? असे अनेक प्रश्‍न यानिमित्त उपस्थित झाले आहे.

Web Title: The large municipal defaulters