टपाल मतपत्रिकेसाठी आज शेवटचा दिवस 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

नागपूर : निवडणुकीच्या प्रक्रियेत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्‍यक टपाल मतपत्रिका घेण्यासाठी सोमवार (ता. 14) शेवटचा दिवस आहे, अशी माहिती जिल्हानिवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 

नागपूर : निवडणुकीच्या प्रक्रियेत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्‍यक टपाल मतपत्रिका घेण्यासाठी सोमवार (ता. 14) शेवटचा दिवस आहे, अशी माहिती जिल्हानिवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 

निवडणुकीच्या कामात जवळपास 19 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतपत्रिका आवश्‍यक आहे. ही मतपत्रिका त्यांना नियुक्ती असलेल्या मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मिळणार आहे. यासाठी त्यांना निवडणूक नियुक्तीच्या आदेशासह ओळखपत्र आवश्‍यक असणार आहे. सोमवारी तीन वाजेपर्यंत टपाल मतपत्रिकेसाठी अर्ज करायचा असून, 23 तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान करता येईल. यासाठी आवश्‍यक गॅजेटेट अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. आतापर्यंत 10 हजार 512 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अर्ज घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी उपस्थित होते. 

16 पर्यंत घरपोच मिळणार वोटर स्लिप 
लोकसभेचा अनुभव पाहता यंदा प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. मतदारांना मतदान केंद्राची माहिती होण्यासाठी आवश्‍यक वोटर स्लिपचे वितरण लवकर करण्यात येणार आहे. 70 टक्के वोटर स्लिपची छपाई झाली असून, ती संबंधित बीएलओंकडे दिली आहे. 16 तारखेपर्यंत सर्व मतदारांना स्लिप वाटप करण्यात येईल. कामाच्या व्यापामुळे एखाद दोन दिवस जास्त लागू शकेल. मात्र, यंदा सर्वांना वोटर स्लिप देण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले. 

जप्तीची दोन्ही प्रकरणे प्राप्तिकर विभागाकडे 
आचारसंहिता लागल्यापासून आजपर्यंत चार ठिकाणी रोकड जप्तीची कारवाई करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सावनेर विधानसभा मतदारसंघात 9 लाख 60 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि खुर्सापार तपासणी नाक्‍यावर पाच लाखांची रक्कम जप्त केली होती. ही दोन्ही प्रकरणे तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे वर्ग करण्यात आली. हिंगणा येथे जप्त केलेले दोन लाख 87 हजार व पूर्व नागपूर येथील जप्त दोन लाख 38 हजारांची चौकशी सुरू असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. 

आज दक्षिण मतदारसंघात मॉक व्होटिंग 
ईव्हीएम जोडणीचे काम पूर्ण झाले असून, प्रत्येक मतदारसंघात मॉक व्होटिंग करण्यात येणार आहे. सोमवारी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बर्डी येथील बचत भवन येथे मॉक व्होटिंग होणार आहे. यावेळी उमदेवार व प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील. रॅंडमली ईव्हीएमची निवड करण्यात येणार आहे. मतदारसंघातील एकूण पाच टक्‍के ईव्हीएमवर प्रत्येक एक हजार मत टाकण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Last day for postal ballot