'सर्वसामान्यांच्या न्यायासाठी वकीलांची भुमिका कौतुकास्पद'

संजय खेडेकर
रविवार, 29 एप्रिल 2018

चिखली तालुक्यातील वरखेड येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा ही ओजस आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून गौरवास पात्र ठरली आहे. या निमीत्ताने शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सत्कार करुन याच ठिकाणी या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चिखली : समाजातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वकील मंडळींनी घेतलेली ही भूमिका कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती तथा महाराष्ट्र प्रशासकिय न्यायधिकरण (मॅट) चे अध्यक्ष न्यायमुर्ती अंबादास जोशी यांनी काढले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाचा वकील संघ आणि बुलडाणा वकील संघाच्या वतीने तालुक्यातील वरखेड येथील जिल्हा परीषद मराठी शाळेमध्ये आयोजित ‘न्यायदूत’ या संकल्पनेतुन साकारलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जोशी बोलत होते. 

चिखली तालुक्यातील वरखेड येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा ही ओजस आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून गौरवास पात्र ठरली आहे. या निमीत्ताने शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सत्कार करुन याच ठिकाणी या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहकार मंत्रालयातील खासगी सचिव विद्याधर महाले, अतिरीक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे, जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, नागपुर उच्च न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किशोर, बुलडाणा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.राज देवकर, ‘न्यायदूत’चे जिल्हा समन्वयक अ‍ॅड.अमोल बल्लाळ, वरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनुताई गवई, ज्येष्ठ विधीज्ञ आर.एल.खापरे आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सर्वसामान्यांची कामे करुन व प्रसंगी कोणतेही शुल्क न घेता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यास मदत केली जाईल असे आश्‍वासन यावेळी उच्च न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल किशोर यांनी दिले. सहकार मंत्रालयातील खासगी सचिव विद्याधर महाले, अतिरीक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे, जिल्हा परीषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करतांना वरखेड येथील जिल्हा परीषद शाळेचे आणि वकील संघाच्या उपक्रमाचे कौतुक करीत जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासंदर्भांत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. उदघाटन सत्राचे संचलन ‘न्यायदूत’ चे समन्वयक अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी केले. तर जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.अमोल बल्लाळ यांनी आभार मानले. शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सत्कार होत असतांना ग्रामीण भागातील शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ‘वुई शाल ओव्हरकम...’ हे स्फुर्तीगीत गाऊन उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले.

Web Title: lawyer role important in society