कामगार नेते वेणू पी नायर म्हणाले, गोळ्या झेलू, पण....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

एनयूआरएमचे 65 वे अधिवेशन 20 ते 22 नोव्हेंबरदरम्यान गोव्यातील मडगाव येथे होणार आहे. त्यात भारतीय रेल्वेत सुरू असलेल्या खासगीकरणाच्या विरोधातील आंदोलन, संपासंदर्भातील नियोजनावर चर्चा होईल.

नागपूर : सरकारने पोलिस, मिलिटरी कुणालाही उभे करावे, प्रसंगी गोळ्या झेलू, पण खासगी तेजस एक्‍स्प्रेस मध्य रेल्वेतून सहजासहजी चालवू देणार नाही, असा इशारा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू पी नायर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. एनयूआरएमच्या मडगाव येथे होणाऱ्या अधिवेशनात आंदोलनाची रूपरेषा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार नसल्याचे बोलतात. त्याचवेळी रेल्वेमंत्री मात्र खासगी तत्त्वावरील तेजस एक्‍स्प्रेसला चालना देण्याचे भाष्य करीत आहेत. केवळ भांडवलदारांच्या लाभासाठीच तेजसचा आग्रह धरला जात आहे. दुप्पट भाडे आकारूनही तेजसला थांबे आणि लागणारा वेळ अधिक असल्याने सामान्य प्रवाशांना ते परवडणारे नाही. म्हणूनच तेजसला 40 टक्केही प्रवासी मिळत नाही. दुसरीकडे सरकार मात्र तेजसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असल्याचे भासवित आहे. करारानुसार संपूर्ण यंत्रणा रेल्वेचीच असली तरी उशीर झाल्यास प्रतिप्रवासी अडीचशे रुपये प्रमाणे रेल्वेकडून परतावा द्यावा लागणार आहे. थंडीत धुक्‍यामुळे गाड्या उशिरा धावतात. म्हणजेच रेल्वेसाठी हा तोट्याचा व्यवहार ठरणार आहे. प्रवाशांवरही भाड्यापोटी दुप्पट भार टाकला जाणार असल्याने मध्य रेल्वेतून ही गाडी चालवू देणार नाही.

एनयूआरएमचे 65 वे अधिवेशन 20 ते 22 नोव्हेंबरदरम्यान गोव्यातील मडगाव येथे होणार आहे. त्यात भारतीय रेल्वेत सुरू असलेल्या खासगीकरणाच्या विरोधातील आंदोलन, संपासंदर्भातील नियोजनावर चर्चा होईल. त्यापाठोपाठ चेन्नईत रेल्वे कामगार संघटनांच्या फेडरेशनचेही अधिवेशन होणार असून त्यातही आंदोलनाच्या नियोजनावर एकमत केले जाणार असल्याचे नायर म्हणाले. पत्रकार परिषदेला विभागीय सचिव हबीब खान, अध्यक्ष एस. के. झा, शाखा अध्यक्ष देबाशीष भट्टाचार्य, ई. वी. राव उपस्थित होते.

रेल्वेच्या जागेवर डोळा
भायखळा येथील प्रिंटिंग प्रेस, परेलचा कारखान्यासह अन्य ठिकाणचे प्रकल्प गुंडाळण्याचे प्रयत्न केले जात आहे. रेल्वेच्या जागेवर अनेकांचा डोळा असून त्यासाठीच हा उपद्‌व्याप सुरू आहे. कुणाचेही मनसुबे पूर्ण होऊ देणार नसल्याचे नायर यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leader Venu P Nair said he would take bullets, but ...