नक्षल्यांची जांबुळखेडा बॉम्ब स्फोटाची जबाबदारी स्वीकारणारी पत्रके आढळली!

मनोहर बोरकर
शुक्रवार, 17 मे 2019

  • जांबुळखेडा येथील स्फोटात शीघ्र कृती दलाचे 15 जवान शहीद झाले होते 
  • बॉम्ब स्फोटाची जबाबदारी घेत नक्षल चळवळीचे अभिनंदन करणारी पत्रके
  • शासनाच्या धोराणांचा तीव्र विरोध

एटापल्ली (जि. गडचिरोली) : भामरागड पोलीस स्टेशन हद्दीतील आरेवाडा रस्त्यावर नक्षल्यांनी पत्रके टाकून 1 मे महाराष्ट्र दिनी जांबुळखेडा गावाशेजारी झालेल्या बॉम्ब स्फोटाची जबाबदारी घेत नक्षल चळवळीचे अभिनंदन करण्यात आले असून शासनावर टिका करण्यात आली आहे. पहिल्यांदाच माओवादी चळवळीने अशा प्रकारच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. हे विशेष!

माओवाद्यांनी 1 में महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला कुरखेडा तालुक्यातील दादपुर येथील डांबर प्लांटच्या वाहनांची जाळपोळ घटनेची चौकशी कामी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य करून जांबुळखेडा गावाशेजारी मुख्य रस्त्यावरील नाल्यावर भुसुरूंग स्फोट घडवून एका खाजगी वाहनांतील शीघ्र कृती दलाचे 15 जवान व एक खासगी वाहन चालकाचा मृत्यू झाला होता. या घटनेची जबाबदारी तब्बल दोन आठवड्यानंतर स्वीकारतांना एप्रिल 2018 मध्ये भामरागड तालुक्यातील कसनासुर, बोरिया पोलीस नक्षल चकमकित ठार झालेल्या 40 माओवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेतल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ही घटना घडविणाऱ्या नक्षल्यांचे पत्रकातून अभिनंदन आले आहे, तसेच शासनाच्या धोराणांचा तीव्र विरोध करून एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाड़ी लोहखनीज उत्खननाला विरोध असल्याचे नमूद करून नागरिकांकडून तिव्र जनसंघर्ष करण्याचे आव्हान पत्रकातून करण्यात आला आहे. 

गेली अनेक दिवसांपासून जिल्ह्यात नक्षल्यांचा धुमाकुळ सुरु असून पोलीस खबऱ्यांचे अपहरण, हत्या, शासकीय विकास कामांवरील वाहने, साहित्याची जाळपोळ, पोलिसांना लक्ष्य करून गोळीबार व बॉम्ब स्फोट घडविण्याच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पत्रकात भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी दक्षिण गडचिरोली झोन असा उल्लेख करण्यात आला आहे.

Web Title: leaflets by Naxalites found accepting the responsibility of bomb explosion in Jambulkheda