सोनेगावात दिसला बिबट्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

चिमूर (जि. चंद्रपूर) : येथून दोन किलोमीटर अंतरावरील सोनेगाव (वन) येथील गावालगतच्या तलाव परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिमूर (जि. चंद्रपूर) : येथून दोन किलोमीटर अंतरावरील सोनेगाव (वन) येथील गावालगतच्या तलाव परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी (ता. 24) सकाळी 10 वाजताच्या सुमारास सोनेगाव येथील शेतकरी आणि गुराख्याला तलाव परिसरात बिबट आढळून आला. त्याने कळपातील शेळीवर हल्ला करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. आरडाओरड करून त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुमारे अर्धा तास झुडपात बिबट लपून होता. शेतीचा हंगाम सुरू आहे. अशात बिबट्याचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बिबट्याने ठाण मांडल्याची माहिती सोशल माध्यमावर व्हायरल झाली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली. त्यामुळे सोनेगावाला जत्रेचे स्वरूप आले होते. परिसरात वन कर्मचारी व वनमजुरांच्या माध्यमातून गस्त राबविण्यात येत आहे. काही ठिकाणी ट्रॅप कॅमेरेसुद्धा लावले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leapord appeared in Sonegaon