बिबट्याच्या हल्ल्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

चिमूर/खडसंगी (जि. चंद्रपूर) : संघारामगिरी (रामदेगी) येथे धुतांग अधिष्ठान करीत असलेल्या बौद्ध भिक्‍खूवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 11) सकाळी दहाच्या सुमारास घडली. राहुल बोधी भन्ते (वय 43, पूर्वाश्रमीचे राहुल वाळके) असे मृत बौद्ध भिक्‍खूचे नाव आहे.

रामदेगी हिंदू आणि बौद्ध धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले स्थळ आहे. येथे बौद्ध अनुयायी मोठ्या प्रमाणावर येतात. पहाडावर विहार बांधण्यात आले आहे. तेथे भन्ते निवास करतात. सोनेगाव वन येथील राहुल वाळके हेसुद्धा चिवर धारण करून भिक्‍खू संघात सामील झाले. त्यांचे राहुल बोधी असे नामकरण करण्यात आले. राहुल बोधी बौद्ध पद्धतीप्रमाणे चाळीस दिवसाच्या धुतांग अधिष्ठानाकरिता विहाराच्या दूर एका झाडाखाली नेहमीप्रमाणे बसले होते. मंगळवारी (ता. 11) सकाळी दहाच्या सुमारास दबा धरून असलेल्या बिबट्याने मागून त्यांच्यावर हल्ला केला. बराचवेळ लोटून गेल्यावर राहुल भन्ते आले नाही. त्यामुळे भन्ते धम्मपाल आणि वनविभागाचे काही कर्मचारी नवेगाव रस्त्यालगत असलेल्या झुडपाकडे गेले. तेव्हा त्यांचा मृतदेह तेथे दिसून आला. बफर झोनचे उपसंचालक नरवने, एसीफ राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी दुरगेकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

Web Title: leapord killed Buddhist monk