रेल्वेस्थानकावर 'एलईडी'चा प्रकाश ऊर्जाबचतीच्या दिशेने पाऊल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

नागपूर - मध्य रेल्वेने ऊर्जाबचतीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत रेल्वेस्थानकांवर एलईडी लाइट लावण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नागपूर रेल्वेस्थानक तब्बल अडीच हजार एलईडी ट्यूबलाइट लावण्यात येणार आहे.

नागपूर - मध्य रेल्वेने ऊर्जाबचतीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत रेल्वेस्थानकांवर एलईडी लाइट लावण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नागपूर रेल्वेस्थानक तब्बल अडीच हजार एलईडी ट्यूबलाइट लावण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य शासनातर्फे ऊर्जाबचतीसाठी एलईडी बल्बच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उन्नतज्योती बाय अफॉर्डेबल एलईडी फॉर ऑल (उजाला) योजनेंतर्गत देशभरात परवडणाऱ्या दरात एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात येत आहे. भारतात सुमारे 10 कोटींपेक्षा जास्त बल्बचे वाटप करण्यात आले आहे. त्यातून दरवर्षी सुमारे 108 कोटी युनिट विजेची बचत आणि कार्बन उत्सर्जनात 16 लाख टनपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य आहे. रेल्वेनेसुद्धा ऊर्जाबचतीसाठी एलईडी बल्ब लावण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत नागपूर स्थानकही एलईडी दिव्यांनी प्रकाशित करण्यात येणार आहे. गरजेनुसार सर्वच फलाटांवर एलईडीचे ट्यूबलाइट लावण्यात येत आहे. सर्वाधिक साडेचारशे ट्यूबलाइट फलाट क्रमांक 1 वर लावण्यात येणार असून, स्थानकावर अडीच हजार ट्यूबलाइट लागणार आहे. विद्युतीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला असून, गतीने हा प्रकल्प साकारण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावरील ऊर्जेची बचत होण्याची अपेक्षा आहे.

नागपूर राज्यात अव्वल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलईडी बल्बचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले होते. नागपूरकरांनी त्यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेले एलईडी बल्बच्या खरेदीत नागपूर राज्यात अव्वल राहिले आहे.

Web Title: LED in railway station