हिंगण्यात "लीगल बूथ कॅप्चरिंग'!;

 विजय घोडमारे . समीर मेघे
विजय घोडमारे . समीर मेघे

वाडी (जि.नागपूर) ः निवडणुकीत मतदारसंघात भाजप-सेनेचे उमेदवार समीर मेघे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विजय घोडमारे यांचा 46 हजार मतांनी पराभव केला. हा विजय खऱ्या मतदारांकडून झाला नाही. मेघे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने तहसील कार्यालयाला हाताशी घेऊन स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी, विद्यार्थी, तसेच मतदारसंघाबाहेरील नातलगांची नोंदणी करून त्यांच्याकडून मतदान करवून घेतल्यामुळे आपला पराभव झाला असल्याचा गंभीर आरोप विजय घोडमारे यांनी वाडी येथील पत्रकार परिषदेत केला. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजय घोडमारे, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, बसपचे नरेंद्र मेंढे, वंचित बहुजन आघाडीचे दिनेश बन्सोड, राजेश जंगले आदींनी या संयुक्‍त पत्रकार परिषदेत आरोपाला दुजोरा दिला. 
घोडमारे यांनी चार महिन्यांत 25 हजार मतदारांची वाढ ही संशयास्पद बाब असल्याचे सांगितले. निकाल घोषित झाल्यावर 46 हजारांचा फरक हा संशयास्पद वाटल्याने मतदारयादी परीक्षण करण्यात आले. तेव्हा 50 हजारांहून अधिक मतदार मतदारसंघाच्या क्षेत्राबाहेरील असल्याचे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे या मतदारांची नावे जुन्या यादीतून वगळण्यात आली नसल्याचे घोडमारे म्हणाले. 
लोकशाहीला घातक अशी कृती करून समीर मेघे यांनी विजय मिळविला असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले. आमदार मेघे यांच्या वर्धा येथील दवाखान्यातील प्रशासकीय अधिकारी राजेंद्र सव्वालाखे यांनी सातगाव येथील मतदान केंद्रावर नोंदणीकृत मतदान यादीनुसार सपत्नीक मतदान केले. वाडी, दवलामेटी या मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने मेघे यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील व वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मतदान केले. विशेष म्हणजे वानाडोंगरी येथील पशुपालन दुग्ध व्यवसाय करणाऱ्या "स्लम एरिया'त 10 पेक्षा अधिक मेघे कुटुंबातील लोकांना रहिवासी दाखवून त्यांची नावे मतदार यादीत आणली. त्यांनी येथे येऊन मतदान केले. नागपूर, वर्धा, आर्वी, मोर्शी, धामणगाव रेल्वे येथील सूतगिरणी कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी यांची नावे मतदार यादीत नोंदणी करून जवळपास 50 हजार लोकांनी येथे येऊन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदान केले असल्याचे घोडमारे यांनी पुरावे सादर केले. तहसीलदार, जिल्हाधिकारी व राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार करण्यात येईल. प्रसंगी उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. पत्रकार परिषदेला यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेश जयस्वाल, श्‍याम मंडपे व आशीष इखनकर, कॉंग्रेसचे तालुकाप्रमुख प्रकाश कोकाटे, वाडी शहराध्यक्ष शैलेश थोराणे, अश्‍विन बैस आदींची उपस्थिती होती. 
.तर राजकीय संन्यास घेईन! 
माझे मतदान 31 वर्षांपासून टाकळघाट येथेच आहे. हे खोटे आढळून आल्यास राजनीतिक संन्यास घेण्याचा मनोदय घोडमारे यांनी व्यक्त केला. जर हे सिद्ध न झाल्यास समीर मेघे यांनी संन्यास घ्यावा. या कृतीमुळे संविधान, लोकशाही व निवडणूक प्रक्रियेला मोठा धोका निर्माण झाला असल्याने वंचित बहुजन आघाडीचे दिनेश बंसोड, राजेश जंगले, बसपचे नगरसेवक नरेंद्र मेंढे यांनी मेघेंच्या कृतीचा निषेध केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com