शंभूराज देसाई यांचे पालकत्व ठरले मृगजळ...म्हणून या जिल्ह्यात वैध व्यवसायाला बंदी; अवैधांची चांदी!

illlegal business.jpg
illlegal business.jpg

वाशीम : कोरोनाच्या प्रकोपात उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. कामगार, बेरोजगार, शेतकरी बेजार, व्यापारी हवालदिल या परिस्थितीत जिल्ह्यामध्ये अवैधव्यावसायिकांची मात्र, चांदी होत असल्याचे चित्र आहे. ज्यांच्यावर पालकत्वाची जबाबदारी आहे. ते पालकमंत्री शंभूराज देसाई पाच महिन्यांपासून जिल्ह्यात फिरकलेच नसल्याने कोणाचा धाक संबंधित विभागाला उरला नाही. त्यामुळे अवैध व्यावसायिक सुखनैव नांदत आहेत.

कोरोनाच्या हैदोसामध्ये लॉकडाउन लागू झाल्याने सगळे मान्यताप्राप्त व्यवसाय बंद झाले आहेत. जिल्ह्यात हजारो कामगार काम नसल्याने घरी बसले आहेत. पुण्या-मुंबईत गेलेल्या युवकांच्या मनी ऑर्डरवर शेकडो घरे चालत होती. त्या मुलांनाच बेकार होऊन हजार -पाचशे किलोमीटरचे अंतर चालत घर गाठावे लागत आहे. या भयाण परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई मात्र ता. 26 जानेवारीपासून जिल्ह्यात फिरकलेच नसल्याने, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नसल्याचे चित्र आहे. पालकत्वाचे छत्रच हरविल्याने अवैध व्यावसायिक शिरजोर झाले आहेत. 

या लॉकडाउनच्या काळामध्ये भूतो न भविष्यती असा गावठी दारूचा व्यवसाय गावागावांत फोफावला आहे. त्याचे दरही अव्वाच्या सव्वा असल्याने या दारूमाफियांनी खोर्‍याने पैसा जमा केला आहे. जुगाराचे अड्डेही वाताणुकुलीत बंगल्यात बिनबोभाटपणे चालत आहेत. वरली, मटका यात कोणताही खंड पडला नाही. ही परिस्थिती अटोक्यात आणणारी यंत्रणा कोरोना बंदोबस्ताचा दाखला देत असल्याने कारवाईची अपेक्षा कुणाकडून करायची? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पालकांच्या व्यथा पालकत्व जाणेल काय?
जिल्ह्यामध्ये अनेक अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना लॉकडाऊनआधी घडल्या आहेत. शाळेत जाणार्‍या चिमुकल्या अचानक गायब झाल्याने, पालकांनी पालकमंत्र्यांच्या दरबारापर्यंत टाहो फोडला होता. मात्र, आता चार महिन्यानंतर या मुलींचा सुगावा लागत नसल्याने पालकांच्या डोळ्यांतील अश्रूही सुकले आहेत. कोरोनाच्या लढाईत पोलिस दल प्रशंसनीय भूमिका बजावत असले तरीही, या मुलींचे काय? हा प्रश्‍न रोज उभा राहतो. चिमणीगत बागडणार्‍या मुलींवाचून सुनेआंगण पालकमंत्र्यांची पालकत्वावर प्रश्‍न चिन्ह उपस्थित करीत आहे. मुख्य म्हणजे, दस्तूरखुद्द पालकमंत्री हे गृहमंत्रीही असल्याने जिल्ह्यातील पोलिस दल या मुलींचा शोध तत्परतेने लावेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तिही फोल ठरत आहे.

हे तर त्यांचे कर्तव्यच
जिल्ह्यामध्ये पोलिस दलाकडून कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी प्रशंसनीय कामगिरी झाली आहे. यात कोणताही वाद नाही. मात्र, जिल्ह्यातील अवैधधंदे, गावठी दारू, सोनसाखळीत नटलेला गुटख्याचा अवैध व्यवसाय याबाबी प्रखरतेने समोर येत आहेत. अवैध व्यवसायांवर कारवाई करणे, हे पोलिसांचे कामच आहे. शासनाने त्यासाठीच हा विभाग तयार केला आहे. मात्र, कर्तव्याचे कवित्वच जास्त होत असल्याने, मूळ मुद्दा बाजूला पडला आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या पालकत्वात हा कारभार समर्थनीय कसा ठरेल? पोलिस प्रशासनाकडून ज्या कारवाया केल्या जातात, ते कामच त्यांचे आहे. अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

लोकप्रतिनिधींच्या तोंडाला कुलूप
कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही गायब झाले आहेत. खासदार भावना गवळी वगळता कोणत्याही लोकप्रतिनिधीचा जनसंपर्क थांबला आहे. जिल्ह्याच्या परिस्थितीत अवगत असूनही त्यांनी मात्र तोंडाला कुलूप लावले आहे. काही लोकप्रतिनिधी फेसबुकवर ऑनलाइन येऊन सोपस्कार अटोपले. तर काहींचा परप्रांतियांप्रती असलेला लळा उजागर झाला. काही तर अदृश्यच झाले. या परिस्थितीत जिल्ह्याला वाली कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com