esakal | राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर  - अजित पवार

बोलून बातमी शोधा

null
राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर  - अजित पवार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर - राज्यात चार वर्षांपासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारीत चढत्या क्रमाने जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावाच्या चर्चेत केला. 

राज्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होत आहे. पोलिसांचा धाक उरला नाही. मुख्यमंत्र्यांच्या शहरात 11 दिवसांत नऊ खून झाले आहेत. पोलिसांना गुंडांकडून मारहाण होते. एटीएम फोडले जात आहेत. केवळ नागपूर नव्हे तर राज्यभरात अशीच परिस्थिती आहे. तुरुंगात असलेले, बडतर्फ अधिकारी आणि बाहेर पोस्टिंग असलेल्या अधिकाऱ्यांचे नाव बढती यादीत येते. त्यामुळे राज्याची नाचक्की होत आहे. नेमके सरकारमध्ये काय चालले आहे हे कळत नाही. रोजगार, महागाईमुळे जनता त्रस्त आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे व्यावसायिक त्रस्त असल्याचे अजित पवार म्हणाले. 

राज्यात उद्योग यावे यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रत्यक्षात किती योजना आल्यात ते कळत नाही. गुंतवणूक वाढत नाही. नुकतीच जाहीर केलेल्या "ईज ऑफ डुईंग बिझनेस'च्या क्रमवारीत महाराष्ट्र तेराव्या क्रमांकावर पिछाडला गेल्याची टीका त्यांनी केली. भाववाढीमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. ती पुढल्या निवडणुकीत सरकारला घरी बसविणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला. 

कामगार मंडळात गैरप्रकार 
कामगार मंडळात कामगाराच्या सुरक्षतेसाठी खरेदी करण्यासाठी काढलेल्या निविदामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अजित पवार यांनी सभागृहात केला. बाजारात या सामग्रीची किंमत दोन हजार असताना त्याला पाच हजाराने खरेदी केल्याची माहिती त्यांनी दिली. सीबीआय चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली. 

पुन्हा मुन्ना यादव 
सभागृहात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात माहिती देताना भाजपचे आमदार सुधाकर कोहळे यांनी ते तुमच्याच पक्षाचे असल्याचा टोमना अजित पवार यांना मारला. याला उत्तर देत मुन्ना यादव तुमच्याच पक्षाचे ना असे प्रतिउत्तर देत चूप केले. शिवाय "बोलायला बसल्यास तुमचे वाभाडे काढील' असे सुनावले. त्यामुळे याही अधिवेशनात पुन्हा एकदा मुन्ना यादव यांचे नाव समोर आले.