कुत्र्याच्या शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत

भुपेश बारंगे
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019

कारंजा (घा) : 'कुत्ता अपने गली मे शेर होता है', ही म्हण असली तरी काल रात्री कुत्र्याने स्वतःचे जीव वाचवण्यासाठी चक्क बिबट्याला गुंगारा देत विहिरीतच पाडले.

कारंजा (घा) : 'कुत्ता अपने गली मे शेर होता है', ही म्हण असली तरी काल रात्री कुत्र्याने स्वतःचे जीव वाचवण्यासाठी चक्क बिबट्याला गुंगारा देत विहिरीतच पाडले.

बिबट्या कुत्र्याची शिकार करण्यासाठी पाठलाग करत असताना विहिरीत पडला. शिकारीसाठी कुत्र्याच्या मागे धावताना शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवंत बाहेर काढण्यात आले. कारंजा (घाडगे) तालुक्याच्या मरकसूर शिवारात ही घटना घडली. बारा तासांच्या कालावधीनंतर बिबट्याला सुरक्षित
बाहेर काढण्यात आले. रेस्क्यू टीमने सकाळी साडेसातच्या सुमारास सुरू केलेले रेस्क्यू ऑपरेशन साडेदहा वाजता संपले. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नांनंतर या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

कारंजा (घाडगे) तालुक्याच्या मरकसूर शिवारात श्याम वरोकर यांची शेती आहे. शुक्रवारी (ता. 1) फेब्रुवारी रोजी श्याम वरोकर शेतात होते. त्यांच्या शेतात जवळपास पाच कुत्रे आहेत. यातील एका कुत्र्यावर काल रात्री बिबट्याने झडप घातली. त्यावेळी सोबत अन्य कुत्र्यांनी बिबट्यावर धावून पाडले. यात पहिला कुत्रा बिबट्याच्या तावडीतून सुटल्यानंतर तो पळू लागला. यात त्याचा पाठलाग करू लागला. त्यावेळी अन्य 
कुत्रेही पळू लागले. काही अंतरावर शेतमालकाची विहिरीजवळ जाताच कुत्र्याने बिबट्याला गुंगारा दिला. त्यात बिबट्या सरळ विहिरीत पडला.

विहिरीतून वाघाचा आवाज येत असल्याने ते पाहण्यासाठी शेतमालक श्याम वरोकर गेले असता वरोकर यांना विहिरीत बिबट्या पडलेला आढळला. कुत्र्याच्या मागे धावताना विहिरीत पडलेला बिबट पाहून वरोकर यांना धक्काच बसला. वरोकर यांनी याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्याना माहिती दिली.

कर्मचाऱ्यानी ही माहिती देताच कारंजा वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यानी घटनास्थळ गाठले. वन परिक्षेत्राधिकारी दादा
राऊत यांच्या मार्गदर्शनात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर घटनास्थळी पाळत ठेवली. विहिर धोकादायक असल्याने रात्रीच्यावेळी रेस्क्यू करणे शक्य होत नव्हते.

सकाळी साडेसातच्या सुमारास वन विभागाच्या जलद बचाव गट
रेस्क्यू टीमने शेत गाठून बचावकार्य सुरु केले. बिबट्याला बाहेर
काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. काही तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याने पिंजऱ्यात शिरकाव केला. बिबट्या आत शिरताच पिंजरा विहिरीबाहेर काढण्यात आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यानी बिबट्याला सुरक्षितस्थळी नेले.

साडेतीन वर्षांचा बिबट्या

बिबट्याचे वय अंदाजे साडेतीन वर्षांचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याला सुखरूप जीवंत बाहेर काढण्याचा आनंद अधिकारी, कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

रेस्क्यू टीमला महत्त्वपूर्ण यश

मुख्य वनसंरक्षक अग्रवाल यांच्या हस्ते वर्धा वन विभागाच्या रेस्क्यू टीमची सुरवात करण्यात आली. तसेच वनमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याचे उद्घाटन केले. या टीमला पहिल्याच आठवड्यात बिबट्या जीवंत बाहेर काढण्यात मोठे यश मिळाले. 

उपवनसंरक्षक सुनील शर्मा, वध्र्याचे वन परिक्षेत्राधिकारी सागर बनसोड, कारंजाचे वन परिक्षेत्राधिकारी दादा राऊत यांच्या मार्गदर्शनात रेस्क्यू टीमचे पी. डी. डेहनकर, डी.आर. पाटील, एम.एल. सज्जन, यू.व्ही. शिरपूरकर, जे.बी. शेख, एस.एस. सिद्दीकी, सी.एस. उईके, जी.आर. मुसळे, रमेश कुकडे, एन.जे. कदम, के.के. काजळे, व्ही.व्ही. सोनवणे, आर.के. ढोबाळे यांनी बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यांना वन विभागाचे एल.एन. माहुरे,  डब्ल्यू.आर. ढोबाळे, ए.एन.
पवार, एम.एस. माने, व्ही.पी. दिघाडे, पी.डी. कनेरी, एम.आय. राऊत, के.बी. दहातोंडे, पुरुषोत्तम कळसाईत, एम.डी. धामंदे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Leopard Collapsed in the well