आर्णी : झाडाच्या खोडात लपले बिबट्याचे बछडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

  • पांगरी शिवारात आढळले बिबट्याचे बछडे
  • शेतकर्‍यांत भीती; आर्णी वनविभागाच्या पथकाचे हालचालींवर लक्ष
  • लाकडी मचान टाकून गस्त सुरू

आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील पहूर नस्करी व पांगरी शेतशिवारात मंगळवारी (ता. 11) बिबट्याचे बछडे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच आर्णी वनविभागाचे अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आठ ते दहा दिवसांपूर्वीच जन्मलेल्या या बछड्याच्या शोधार्थ त्याची आई येणार असल्याच्या शक्यतेने वनविभागाने शेतशिवारात कॅमेरे लावले असून, अधिकारी-कर्मचार्‍यांचे पथकही हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

आर्णी तालुक्यातील मौजा पहूर नस्करी शिवारातील सदाशिव शेंडे यांच्या शेतालगतच्या झाडाखाली हा बछडा असल्याचे कळताच आर्णी वनपरिक्षेत्राचे अधिकारी आर. बी. रोडगे, सहायक एस. आर. मीश्रा, वनरक्षक सुहास कानडे, बाबूलाल आडे यांनी घटनास्थळी येथून बिबट्याच्या बछड्याची पाहणी केली. पहूर नस्करी, पांगरी शेतशिवारात मादी बिबट्या असून, त्याने आठ ते दहा दिवसांपूर्वीच नर जातीच्या बछड्याला जन्म दिला असून, त्यानंतर आईपासून बछड्याची त्याच्या आईपासून ताटातूट झाल्याने दोघेही शेतशिवारात भटकत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या बछड्याने एका झाडाच्या खोडात आसरा घेतला असून, त्याला घेण्यासाठी त्याची बिबट आई येऊ शकते, या शक्यतेने वनविभागाने बछड्यापासून 100 मीटर अंतरावर लाकडी मचान टाकून गस्त सुरू ठेवली आहे. याशिवाय बछड्यावर लक्ष ठेवण्यासाठी पांढरकवडा येथून कॅमेरे मागवून या परिसरात लावून बछड्याच्या हालचालींवर वनविभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. 

leopard

पशुवैद्यकीय अधिकार्‍याकडून तपासणी -
यवतमाळ येथील सहायक वनरक्षक वीरेंद्र राठोड यांनी बुधवारी (ता. 12) घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी बिबट्याच्या बछड्यावर लक्ष ठेवण्याबाबत अधिकारी-कर्मचारी यांना सूचना केली. याशिवाय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लाड यांनी बछड्याच्या आरोग्याची तपासणी केल्याची माहिती देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard cubs were found hidden in the bole of the tree at aarni yavatmal