पोलिस पाटलासोबतच्या झटापटीत बिबटयाचा मृत्यू

leopard
leopard

कोरची (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशिल भागात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमकी होत असतात. परंतु कोरची तालुक्यात मात्र वेगळी चकमक उडाली. गावाबाहेर शौचास गेलेल्या एका पोलिस पाटलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला चढविला. या चकमकीत पोलिस पाटील जखमी झाला आणि बिबट्याला प्राण गमवावा लागला.

कोरची येथून ७ किलोमीटर अंतरावरील सोहले येथील पोलिस पाटील जुमेन चमाजी काटेंगे (३५)हे आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावाबाहेर शौचास गेले होते. शौचास बसत नाही:तोच एका बिबट्या त्यांच्या अंगावर धावून आला.  बिबट्याने जुमेनचे दोन्ही हात व गालांना ओरबडले. दोघांमध्ये झटापट सुरु असताना जुमेनचा भाऊ तेथे पोहचला व त्याने जुमेनला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. दोघांमध्ये तब्बल १५ ते २० मिनिटे झटापट झाली. रक्तबंबाळ जुमेनला तत्काळ कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. आता तेथे जुमेनवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान जुमेनला बिबट्याने जखमी केल्याची वार्ता गावात व आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पोहचली. बघताबघता हजारो लोक गोळा झाले. त्यावेळी बिबट झुडुपात लपून बसला होता. कुणीही तिकडे जाण्याची हिंमत करीत नव्हते. वनपरिक्षेत्राधिकारी मनोज गढवे यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी वरिष्ठ अधिकांऱ्यांना कळविले. सर्वजण ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. वडसा येथील फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी पी.एम.भोसले दुपारी साडेतीन वाजता घटनास्थळी आले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बिबट्याची पाहणी केली. परंतु बिबट कुठलीही हालचाल करीत नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी बिबट्याला जीपमध्ये टाकले.

त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी गढवे यांनी जखमी जुमेन काटेंगे यांची भेट घेऊन त्यास ५ हजार रुपयांची मदत केली. मृत बिबट दीड ते दोन वर्षे वयाचा होता. काही महिन्यांपूर्वीच तो आपल्या आईपासून वेगळा झाला होता. मार्च महिन्यात या परिसरातील जंगलाला आग लागल्यामुळे जंगलातील ससे, हरीण यासारखे हिंस्त्र प्राण्यांचे खाद्य नष्ट झाले. त्यामुळे बिबट गावाशेजारी येऊन खाद्य शोधायचा. बिबट अशक्त झाला होता, असे आरएफओ गढवे यांनी सांगितले.

अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पूर्णपणे हागणदारीमुक्त झाल्याचे गडचिरोलीत अभिमानाने सांगितले होते. परंतु अजूनही लोकांना गावाबाहेर शौचास जावे लागत असून, त्यांना हिंस्त्र प्राण्यांना बळी पडावे लागत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com