बिबट्याचा बछडा मृतावस्थेत सापडला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

अमरावती - वडाळी वनपरिक्षेत्रातील बांबूवनालगतच्या भवानी तलावाचे कोरड्या पात्रात रविवारी (ता. 21) सकाळी नऊच्या सुमारास सहा महिन्यांच्या बिबट्याचा नर बछडा मृतावस्थेत आढळल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली. 

अमरावती - वडाळी वनपरिक्षेत्रातील बांबूवनालगतच्या भवानी तलावाचे कोरड्या पात्रात रविवारी (ता. 21) सकाळी नऊच्या सुमारास सहा महिन्यांच्या बिबट्याचा नर बछडा मृतावस्थेत आढळल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली. 

भवानी तलावाचे पात्र कोरडे पडलेल्याने वन विभागाने कृत्रिम पाणवठा तयार केला. तेथे पाणी पिण्यासाठी वन्यप्राणी येतात. शनिवारी (ता.20) रात्रीच्या सुमारास मादीपासून वेगळा झालेला सहा महिन्यांचा बछडा पाणवठ्यावर आला असावा. त्याच वेळी मोठ्या बिबटने त्या बछड्यावर झडप घेऊन त्याचा जीव घेतला. रविवारी सकाळी बिबट्याचा बछडा तलावाच्या पात्रात पडून असल्याचे वनकर्मचाऱ्यांना दिसले. मृत बछड्याच्या मानेत पाच इंच मोठ्या दातांचे व्रण आढळले. शिवाय नखांनी ओरबाडल्याच्या खुणा बछड्याच्या पाठीवर दिसल्या. त्यामुळे त्याचा मृत्यू शिकारीने नसून, मोठ्या बिबट्याला आपल्या क्षेत्रात कुणीतरी नवीन आल्याचे दृष्टीस पडताच त्याने झडप घेऊन बछड्याला ठार मारले असावे, अशी शक्‍यता वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्‍चंद्र पडगव्हाणकर यांनी व्यक्त केली. 

पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. जी. श्रीराव यांनी घटनास्थळीच शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडली. उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनीही घटनास्थळी भेट दिली. बिबट्याच्या मृत बछड्याला वनाधिकाऱ्यांनी जंगलात घटनास्थळीच भडाग्नी दिला. 

तो बछडा दुधावरच 

भवानी तलाव पात्रात सापडलेला मृत बछडा हा अद्याप आईच्या दुधावरच अवलंबून होता. शवविच्छेदनातून त्याच्या पोटात मांसांचे लहान तुकडे आढळले. त्यामुळे त्याने नुकताच मांसाहार सुरू केलेला असावा, अशीही शक्‍यता डॉ. आर. जी. श्रीराव यांनी व्यक्त केली. 

Web Title: The leopard is found in the dead