होशियार SSS... अचलपूर शहरालगतच्या शेतशिवारात फिरतोय बिबट 

leopard
leopard

अचलपूर (जि. अमरावती) : कोरोनामुळे अगोदरच जनता भयभीत असताना अचलपूर तालुक्‍यातील शेतशिवारात बिबट्याचा वावर वाढत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात दहशत निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून अचलपूर शहरालगतच्या एका शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळत आहेत. रात्री त्याने दोन सायल प्राणीदेखील फस्त केल्याचे दिसून आले. 

अचलपूर येथील नगरसेविका सुशीला देविदास इंगळे यांच्या अजितपूर शेत सर्वे नं. एकमध्ये बिबट्याचे पगमार्क आढळले आहेत. शहरालगतच असलेल्या नगरसेविकेच्या केळीच्या बागेत दोन दिवसांपासून काही वेगळ्याच प्रकारचे ठसे नगरसेविकेचे पती व दीर यांना दिसले. त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला. बुधवारी (ता. 20) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास परतवाडा वनपरिक्षेत्राची चमू घटनास्थळी पोहोचली. त्यांनी ओल्या जमिनीवरचे ठसे व इतर ठिकाणचे पगमार्क पाहिले असता बिबट्याचेच असल्याचे निष्पन्न झाले. इतरत्र शोध घेतला असता दोन सायल (साळिंदर) प्राण्याचे काटे तथा अवशेष आढळले. त्या पगमार्गांचा शोध घेतला असता बिबट नाल्यामार्गे पुढे निघून गेला असेल, असे वनविभागाच्या चमूने सांगितल्याचे नगरसेविकेच्या पतीने सांगितले. 

माजी नगरसेवक राजेश बघिले यांच्या गोपी रेस्टॉरंटच्या केळीच्या शेतात रविवारी सकाळी ते गेट उघडून आतमध्ये गेले असता गेटच्या आवाजाने बिबट्या पळताना दिसला. त्यांनीही वनविभागाशी संपर्क करून घटना सांगितली. वनविभागाच्या पथकानेही बिबट असल्याचे सांगितले, परंतु तो नरभक्षी नाही, हे सांगायला वनविभाग विसरला नाही. तीन दिवसांपासून त्याचे वास्तव्य याच भागात असल्याचे निष्पन्न झाले आहे. बिबट्याची भीती शहरी भागाकडेही जाणवत असून वनविभागाने याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे, असे मत शेतकऱ्यांसह नागरिकांनी व्यक्त केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com