वरखेड जंगलात बिबट्याची शिकार

File photo
File photo

अमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अकोट उपवनविभागाच्या बफर झोनमध्ये लोखंडी जाळी अडकवून बिबटची शिकार करण्यात आली. शनिवारी (ता. 23) रात्री दुर्गंधी पसरल्यामुळे ही घटना उघडकीस आली.
अकोट उपवनसंरक्षक पी. ब्युलासह त्यांच्या पथकाने वरखेड वारी हनुमान मंदिरानजीक असलेल्या घटनास्थळी रविवारी (ता. 24) भेट दिली असता, मृत बिबट्याच्या शरीराभोवती लोखंडी जाळी आढळली. शिकारीसाठीच ही जाळी येथे लावल्या गेल्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मृत बिबट अंदाजे चार वर्षे वयाचा आहे. दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांनी वनाधिकाऱ्याकडे तक्रार केली. ज्या ठिकाणी बिबट्याची शिकार झाली त्याच्या आसपास पाणवठा नाही. परंतु, वन्यप्राणी या परिसरात मोठ्याप्रमाणात आहेत. पाणवठे आटल्यामुळे तृष्णातृप्तीसाठी त्यांची भटकंती झाली. मृत बिबट्याचे दात, नखे, चामडी जशीच्या तशीच आहे. बिबट जाळीत अडकल्यानंतर त्याचा तडफडून मृत्यू झाला. शिकार केल्यानंतर पाच ते सहा दिवस मृत बिबट्याला घटनास्थळीच ठेवण्याचे कारण समजू शकले नाही. वनविभागाने पशुशल्यचिकित्सकाच्या उपस्थितीत शवविच्छेदन केल्यानंतर मृत बिबट्याला जाळले. उन्हाळ्यात वन्यप्राणी पाण्याच्या शोधात इतरत्र भटकत असल्यामुळे शिकारी त्यांच्या भ्रमंतीवर पाळत ठेवून असल्याची शक्‍यता आहे. वनविभागाने शिकारीची घटना उघडकीस आल्यानंतर चौकशी सुरू केल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com