पांगरी शिवारात आढळला बिबट्याचा बछडा

आर्णी (जि. यवतमाळ) : पहूर नस्करी शेतशिवारातील झाडाच्या खोडात बसलेला बिबट्याचा बछडा.
आर्णी (जि. यवतमाळ) : पहूर नस्करी शेतशिवारातील झाडाच्या खोडात बसलेला बिबट्याचा बछडा.

आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील पहूर नस्करी व पांगरी शेतशिवारात मंगळवारी (ता. 11) बिबट्याचे बछडे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच आर्णी वनविभागाचे अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आठ ते दहा दिवसांपूर्वीच जन्मलेल्या या बछड्याच्या शोधार्थ त्याची आई येणार असल्याच्या शक्‍यतेने वनविभागाने शेतशिवारात कॅमेरे लावले आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथकही हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे.
आर्णी तालुक्‍यातील पहूर नस्करी शिवारातील सदाशिव शेंडे यांच्या शेतालगतच्या झाडाखाली बिबट्याचा बछडा असल्याचे कळताच आर्णी वनपरिक्षेत्राचे अधिकारी रोडगे, सहायक मिश्रा, वनरक्षक सुहास कानडे, बाबूलाल आडे यांनी बछड्याची पाहणी केली. पहूर नस्करी, पांगरी शेतशिवारात मादी बिबट्या असून, तिने आठ ते दहा दिवसांपूर्वीच नर जातीच्या बछड्याला जन्म दिला. त्यानंतर बछड्याची त्याच्या आईपासून ताटातूट झाली. दोघेही शेतशिवारात भटकत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या बछड्याने एका झाडाच्या खोडात आसरा घेतला. त्याला घेण्यासाठी त्याची आई येऊ शकते, या शक्‍यतेने वनविभागाने बछड्यापासून 100 मीटर अंतरावर लाकडी मचान टाकून गस्त सुरू ठेवली आहे. याशिवाय बछड्यावर लक्ष ठेवण्यासाठी पांढरकवडा येथून कॅमेरे मागवून लावले आहे.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी
यवतमाळ येथील सहायक वनरक्षक वीरेंद्र राठोड यांनी बुधवारी (ता. 12) घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी बिबट्याच्या बछड्यावर लक्ष ठेवण्याबाबत अधिकारी-कर्मचारी यांना सूचना केली. याशिवाय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लाड यांनी बछड्याच्या आरोग्याची तपासणी केल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com