esakal | अखेर बिबट जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

अखेर बिबट जेरबंद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उमरखेड (जि. यवतमाळ) : गुरुवारी (ता. 27) विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाण्यातून वाचविल्यानंतर त्याला विहिरीत तब्बल पंधरा तास ताटकळत बाजेवर बसून राहावे लागले. रात्री आठ वाजतादरम्यान पाचारण करण्यात आलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील पथकाने त्या बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यानंतर पैनगंगा अभयारण्यातील मसलगा या घनदाट जंगलात सुखरूप सोडण्यात आले.
उमरखेड तालुक्‍यातील खरूस (ढाणकी) शेतशिवारातील विहिरीत गुरुवारी (ता. 27) पहाटे दोन ते अडीच वर्ष वयाचा बिबट्या पडला. शेतकऱ्याच्या प्रसंगावधाने बिबट्याला जीवनदान मिळाले. दरम्यान, सकाळी घडलेली ही घटना तब्बल पाच तासांनी उजेडात आली. तोवर विहिरीत पाच तास बिबट्याने पोहून जिवंत राहण्यासाठी संघर्ष केला. त्याला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाजेवर आणले. बिबट्याला वर काढून सोडून देण्याचा प्रयत्न वनाधिकाऱ्यांनी केला होता. मात्र, ज्या शेतकरी विलास श्‍यामराव गाडेकर यांनी बिबट्याला पिंजऱ्यात कोंडून जंगलात सोडण्याची मागणी रेटून धरली. त्यामुळे थेट पांढरकवडा वन्यजीव विभागातून बेशुद्ध करण्याचे इंजेक्‍शन व पिंजरा बोलाविण्यात आला. दरम्यान, शेतशिवारात रात्रीला वीज नसल्यामुळे बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी बॅटरीच्या उजेडाचा सहारा घेण्यात आला. बऱ्याच परिश्रमानंतर बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात टाकण्यात आले. यावेळी पांढरकवडा वन्यजीव विभागाचे डीएफओ पंचभाई यांच्या समक्ष पैनगंगा अभयारण्यातील मसलगा बिट क्रमांक 407 मध्ये बिबट्याला सोडण्यात आले.

loading image
go to top