विधानभवनात ज्ञानाचा खजिना खुला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

16 डिसेंबरपासून नागपुरात अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रंथालयसुद्धा खुले झाले आहे. यंदा 97 आमदार हे प्रथमत:च निवडून आले आहेत. या नवीन आमदारांना हे ग्रंथालय उपयुक्त ठरणार आहे. 

नागपूर : नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशनाचे कामकाज नेमके किती दिवसांचे राहील यावरून अद्याप संभ्रम आहे. सध्या एकाच आठवड्याचे कामकाज ठरले आहे. मंगळवारी (ता. 10) मुंबईला कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबद्दल निर्णय होणार आहे. मात्र, नागपूर करारात काय आहे, पहिल्या अधिवेशनात कुठले महत्त्वाचे निर्णय झाले, कुठल्या मुख्यमंत्र्यांने काय आदेश दिले या सर्वांचे संदर्भ मिळवायचे असतील तर विधिमंडळाच्या ग्रंथालयाला भेट द्यावी लागेल. विधानभवनातील सचिवालयाचे कामकाज सुरू झाले सोबतच ग्रंथालयसुद्धा खुले झाले. येथे अनेक संदर्भग्रंथ व पुस्तक उपलब्ध आहेत. 

सोमवार, 16 डिसेंबरपासून नागपुरात अधिवेशन सुरू होणार आहे. तत्पूर्वी, सोमवार 9 डिसेंबरपासून विधिमंडळाच्या ग्रंथालय विभागाचे कामकाज सुरू झाले आहे. ग्रंथालयाविषयी अधिक माहिती देताना वाघमारे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य 1960 पासून अस्तित्वात आले. 1960 पासून सुरू झालेल्या विधिमंडळाचे सर्व कागदपत्रे ग्रंथालयात उपलब्ध आहेत. पीएच.डी करणाऱ्यांसाठी प्रत्येक संदर्भाची पुस्तके ग्रंथालयात आहेत.

 

हेही वाचा - अधिवेशनाचा कालावधी आज ठरणार

 

विधानसभा व विधान परिषदेच्या कामकाजातील विविध विषयांवर दरवर्षी राज्यातील जवळपास 40 ते 45 जण पीएच.डी. करतात. सर्वोच्च न्यायालयातील विविध प्रकरणांचे व संदर्भसुद्धा उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर देशातील विविध राज्यातील उच्च न्यायालयांतील विविध प्रकरणांचेही एकूण 12 लाखांच्या जवळपास कागदपत्रे (संदर्भ) विधिमंडळ ग्रंथालयात उपलब्ध आहेत. पीएच.डी. करणाऱ्यांना हवे तेवढे आणि हवे तेव्हा संदर्भ उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याची वेळच कुणावर येत नसल्याचे वाघमारे यांनी सांगितले. 


बा. बा. वाघमारे

24 डिसेंबरपर्यंत राहणार सुरू
विविध माहितीचे संदर्भ घेणे सोयीचे व्हावे यासाठी नागपूर व विदर्भातील सुशिक्षितांना प्राधान्य दिले जाणार आहे. हे ग्रंथालय 24 डिसेंबरपर्यंत सुरू राहील. केवळ पीएच.डी. करणारेच नव्हे तर संशोधक, विद्यार्थी कुणालाही संदर्भ हवे असल्यास त्यांनी 9321020271 या क्रमांकावर संपर्क साधावा. 
- बा. बा. वाघमारे,
मुख्य ग्रंथपाल व माहिती, संशोधन अधिकारी

 

जाणून घ्या - असं घडायला नको होत जी...  

नवीन आमदारांसाठी उपयुक्त

यंदा 97 आमदार हे प्रथमत:च निवडून आले आहेत. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनात प्रश्‍नोत्तराचा तास होणार नाही. त्यामुळे लक्षवेधी, सूचना, प्रस्तावावर अधिक चर्चा होण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थिती या नवीन आमदारांना हे ग्रंथालय उपयुक्त ठरणार आहे. ज्येष्ठ सदस्य जुन्या संदर्भासाठी ग्रंथालयाचाच उपयोग करतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Library started at Legislative Assembly