जीव गेला पण घर मिळाले नाही, प्रतिक्षेतच त्यागला प्राण...वाचा

Life is gone but no home is found, waiting for the soul to die ... Read on
Life is gone but no home is found, waiting for the soul to die ... Read on

यवतमाळ : 'स्वत:चे घर असावे', असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. त्यासाठी पै पै जमा करावी लागते. पै पै जमा करून असेच स्वप्न एका दिव्यांग, आदिवासी शिक्षकाने बघितले होते. परंतु, सदर योजनेला फार विलंब झाल्याने व 'म्हाडा'ने घरांच्या किमती अचानक वाढविल्याने अखेर त्या शिक्षकाने घराच्या प्रतीक्षेतच प्राण त्यागले. त्यांच्या मृत्यूला 'म्हाडा'च जबाबदार असल्याचा आरोप त्यांचे चिरंजीव शुभम पुसनाके यांनी केला आहे. मात्र, आपले म्हणणे कोणीही ऐकून घ्यायला तयार नसल्याचे शल्य त्यांनी 'सकाळ'जवळ बोलून दाखविले.

अमरावती गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाने यवतमाळ येथील बाजोरियानगरात 28 बैठ्या जोडघरांची योजना 2010 मध्ये प्रस्तावित केली होती. त्यासाठी तीनवेळा जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या लोणी येथील प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक असलेल्या दिव्यांग किशोर विठ्ठलराव पुसनाके यांनी सदर योजनेत अर्ज केला. आदिवासी प्रवर्गातून त्यांचा अर्ज मंजुर झाला. त्यावेळी ते लोणी येथे कुटुंबीयांसह भाड्याच्या घरात राहत होते. त्यांना दोन मुले असून ती शिकत आहेत. त्यांचा मोठा मुलगा शुभम हा बीएस.सी. ला असून, लहान मुलगा चैतन्य बी. ए. ला आहे.

अमरावती 'म्हाडा'ची 28 घरांची योजना फसली

दोन्ही मुले यवतमाळच्या महाविद्यालयांत शिकत आहेत. सेवानिवृत्तीनंतर व मुलांच्या शिक्षणासाठी यवतमाळला आपले हक्काचे घर असावे, म्हणून किशोर पुसनाके यांनी 'म्हाडा'च्या घरासाठी अर्ज केला होता. परंतु, 'म्हाडा'ची सदर योजना मुख्याधिकारी व अभियंत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे फसली. त्यामुळे सदर योजना गेल्या दहा वर्षांतही पूर्ण होऊ शकली नाही. अद्याप या योजनेचे बांधकाम पूर्ण झाले नाही. किशोर पुसनाके यांनी जिवंत असेपर्यंत एकूण सहा हप्त्यांपैकी पाच हप्ते भरले होते. चौथा व पाचव्या हप्त्याची रक्कम 'म्हाडा'ने एकत्रितपणे मागणी केल्याने त्यांना जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे कर्ज काढावे लागले होते. 'म्हाडा'ने घरांच्या किमती अचानक तीन लाख 20 हजारांनी वाढविल्याची माहिती त्यांना जेव्हा भेटली त्यावेळी त्यांना मोठा धक्काच बसला.

लाभार्थ्यांचे कुटुंबीय उघड्यावर

आता एकदम सहावा हप्ता व वाढविलेले तीन लाख 20 हजार रुपये कसे जुडवायचे या चिंतेत ते राहत होते. मुले यवतमाळला भाड्याने खोली करून राहत असल्याने त्यांचा शिक्षणाचा खर्च व ते पत्नीसह स्वत: लोणी येथे घर भाड्याने घेऊन राहत असल्याने त्यांचाही खर्च, असा दुहेरी खर्च त्यांना सोसावा लागत होता. त्यातच त्यांना 'म्हाडा'च्या घराचे हप्ते भरावे लागत होते. शिवाय, पतसंस्थेचे व्याजही भरावे लागत होते. त्या विवंचनेतच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यात त्यांचा उपचारादरम्यान 5 ऑक्‍टोबर 2019 रोजी मृत्यू झाला. त्या सोबतच त्यांनी स्वत:च्या घराचे बघितलेले स्वप्नही अपूर्णच राहिले. त्यांना स्वत:च्या घरात एकही दिवस राहता आले नाही. शिवाय, त्यांच्या जिवंतपणी पत्नी व मुलांसाठी 'छता'ची व्यवस्था केल्याचे समाधानही त्यांना लाभले नाही. त्यांच्या मृत्यूला 'म्हाडा'चे मुख्याधिकारी, अभियंते, कर्मचारी व कंत्राटदार जबाबदार असल्याचे पुसनाके कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मुलगा शुभम यांनी वडिलांच्या नावावरील घर आईच्या नावाने करावे, यासाठी 'म्हाडा'कडे अर्ज केला आहे. परंतु, त्यासाठीही 'म्हाडा'कडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे शुभम यांनी सांगितले.

'माझे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. ते दिव्यांग होते. त्यांनी 2011 मध्ये 'म्हाडा'कडे आदिवासी प्रवर्गातून घरासाठी अर्ज केला. जिवंत असेपर्यंत त्यांनी पाच हप्ते भरले होते. परंतु, 'म्हाडा'ने अचानक घरांच्या किमती वाढविल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्यातच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. घराच्या प्रतीक्षेतच अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला 'म्हाडा'च जबाबदार आहे.'
- शुभम किशोर पुसनाके,
रा. नागापार्डी ता. जि. यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com