अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नागपूर - अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. इंगळे यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

नागपूर - अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. इंगळे यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

हरिचंद्र खानोरकर (५५, रा. चक्रपाणीनगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी आरोपीला मामा म्हणायची. आधार नसल्याने त्याने मुलीला आपल्या घरी ठेवून तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. २००८ ते नोव्हेंबर २०१३ दरम्यान मुलगी त्याच्याच घरी वास्तव्यास होती. दरम्यान, आरोपीच्या पत्नीचे निधन झाले. आरोपी संधी मिळेल तेव्हा तिच्यावर अत्याचार करीत होता. मात्र, अन्य कोणताही आधार नसल्याने ती सर्व सहन करीत होती. दरम्यान, पोटात प्रचंड दुखू लागल्याने ती आईकडे गेली. डॉक्‍टरांकडे गेल्यावर हरिचंद्रच्या पापावरून पडदा उठला. आईने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी  अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्‍सो)अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात डिसेंबर २०१३ मध्येच आरोपीला अटक करण्यात आली होती. 

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि साक्षीपुराव्याअंती गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि २५ हजारांचा दंड व दंड न भरल्यास १ वर्ष कैदेची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे ॲड. ज्योती वझानी यांनी बाजू मांडली. सपोनि के. व्ही. चौगले यांनी प्रकरणाचा तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार सुनील कड, अनिल दानोरकर, नितीन देशमुख यांनी सहकार्य केले.

Web Title: Life imprisonment for the abuser of minor girl